

IND vs ENG Test Series England squad announcement for second test
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून खेळवला जाणार आहे. या सामन्याची तयारी सुरू झाली आहे. पहिला सामना गमावल्यामुळे भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर आहे. दरम्यान, सामन्याला पाच दिवस शिल्लक असतानाच इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. यामध्ये एक मोठा बदल पाहायला मिळत असून, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारत-इंग्लंड मालिकेतील केवळ पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर केला होता. आता ईसीबीने दुसऱ्या सामन्यासाठी संघ घोषित केला आहे. यामध्ये जोफ्रा आर्चरचा समावेश करण्यात आला आहे.
आर्चर सुमारे चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. अलीकडेच तो काउंटी क्रिकेट खेळताना दिसला होता, तेव्हापासूनच तो लवकरच इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. विशेष म्हणजे, संघाने जोफ्रा आर्चरच्या रूपाने एका अतिरिक्त खेळाडूला संघात स्थान दिले आहे, म्हणजेच त्याच्या जागी कोणालाही वगळण्यात आलेले नाही.
आर्चर हा जगातील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक मानला जातो. भारतीय संघाने पहिला सामना आधीच गमावला आहे, त्यामुळे आता आर्चरच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढू शकतात. आर्चरचा संघात समावेश झाल्यामुळे त्याचे अंतिम अकरा (Playing XI) मधील स्थानही जवळपास निश्चित मानले जात आहे.
आता इंग्लंड कोणत्या वेगवान गोलंदाजाला अंतिम संघातून वगळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ख्रिस वोक्सचे खेळणे जवळपास निश्चित आहे, त्यामुळे कदाचित जॉश टंगला संघाबाहेर बसावे लागू शकते. याचाच अर्थ, पहिला सामना जिंकूनही इंग्लंडच्या अंतिम संघात बदल होणार अशी शक्यता आहे.
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जॉश टंग, ख्रिस वोक्स.