Team India Squad Changes : कर्णधार गिल कठोर निर्णयांच्या तयारीत! संघासाठी ‘ओझे’ ठरलेल्या ‘या’ खेळाडूला देणार डच्चू
India vs England Birmingham Test Team India squad changes
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याला अजून काही दिवस शिल्लक असले तरी, भारतीय संघासाठी ‘अंतिम अकरा’ खेळाडूंची निवड ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. संघातील काही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर काही खेळाडू संघासाठी ओझे ठरले आहेत. त्यामुळे, अशाच एका खेळाडूला संघाबाहेर ठेवण्याचे धाडस कर्णधार शुभमन गिल दाखवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
शार्दुल ठाकूर आणि नितीश कुमार रेड्डी संघाचा भाग
बीसीसीआयने इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली तेव्हा, वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूर आणि नितीश कुमार रेड्डी या दोन खेळाडूंचा संघात समावेश केला होता. ‘अंतिम अकरा’ मध्ये कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय कर्णधारावर होता. कर्णधार शुभमन गिलने पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकूरवर विश्वास दाखवला, पण शार्दुलला या संधीचे सोने करता आले नाही. तो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला.
गोलंदाजी आणि फलंदाजीत शार्दुलची सुमार कामगिरी
लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने आठ चेंडूंत केवळ एक धाव केली. त्यानंतर दुसऱ्या डावात तो 12 चेंडूंत 4 धावा करून बाद झाला. फलंदाजीतील ही निराशाजनक कामगिरी संघासाठी चिंताजनक ठरली. गोलंदाजीतही त्याची कामगिरी सुमारच राहिली. पहिल्या डावात त्याने सहा षटकांत 38 धावा दिल्या, पण एकही गडी बाद करू शकला नाही. दुसऱ्या डावात त्याने 10 षटकांत 51 धावा देत दोन गडी बाद केले, पण कसोटी क्रिकेटमध्ये 5 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा देणे महागडे मानले जाते.
शार्दुलच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी मिळण्याची शक्यता
आता प्रश्न असा आहे की, शार्दुल ठाकूरला वगळल्यास त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळणार? याचे उत्तर नितीश कुमार रेड्डी असू शकते. रेड्डीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसला तरी, भारतासाठी खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये त्याने बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळलेल्या नितीश कुमार रेड्डीने एका शतकासह 298 धावा केल्या आहेत आणि 5 बळीही मिळवले आहेत.
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल असा धाडसी निर्णय घेणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या प्रश्नाचे उत्तर कदाचित सामन्याच्या दिवशीच मिळेल.

