

गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. संघाने खेळलेल्या 11 पैकी 7 कसोटी सामन्यांत पराभव पत्करला आहे, तर केवळ 3 सामन्यांत विजय मिळवला असून 1 सामना अनिर्णित राहिला आहे. भारतीय संघाला मायदेशातही लाजिरवाण्या पराभवाला (क्लीन स्वीप) सामोरे जावे लागले आहे. रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यामुळे संघ स्थित्यंतराच्या प्रक्रियेतून जात आहे, परंतु पराभवाची ही मालिका संघ रचनेतील (Team Combination) समस्यांकडे स्पष्टपणे संकेत देत आहे.
भारतीय संघाचा ‘थिंक टँक’ अनेकदा ‘आउट ऑफ द बॉक्स’ म्हणजेच काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात असे निर्णय घेतो, जे पराभवाचे कारण ठरतात. असे करण्याच्या नादात खेळाडूंच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होतो. न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवापासून ते इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीतील पराभवापर्यंत हेच चित्र पाहायला मिळाले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये प्लेइंग 11 ची निवड अनेकदा आश्चर्यकारक राहिली. अनेकदा असे वाटते की, खेळाडूंचा त्यांच्या क्षमतेनुसार योग्य वापर केला जात नाहीये.
गौतम गंभीरच्या प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात बांगलादेशवर विजय मिळवून झाली. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला 0-3 असा दारुण पराभव पत्करावा लागला. या मालिकेतील बंगळूरु येथे झालेला पहिला कसोटी सामना भारताने गमावला. ढगाळ वातावरणात भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर सर्वबाद झाला. या पराभवानंतर अचानक वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देण्यात आले. फिरकीला पूर्णपणे अनुकूल खेळपट्टी तयार करण्याचा निर्णय भारतावरच उलटला. मालिकेत 2-0 ने पिछाडीवर पडल्यानंतर मुंबईतही 'रँक टर्नर'चा निर्णय भारतासाठी आत्मघातकी ठरला.
वर्षाच्या सुरुवातीला ज्या संघाने कमी अनुभवी असूनही संतुलित खेळपट्टीवर इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला नमवले होते, त्याच संघाला केवळ एका पराभवानंतर 'रँक टर्नर'चा आधार घ्यावा लागणे, हे संघ व्यवस्थापनाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
ज्या भारतीय फलंदाजांना फिरकी खेळताना हल्ली अडचणी येतात, त्यांच्यासाठीच 'रँक टर्नर' खेळपट्टी तयार करण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. त्यातच, रविचंद्रन अश्विनसारखा अनुभवी फिरकीपटू संघात उपलब्ध असतानाही वॉशिंग्टन सुंदरला अचानक संधी देणे, हा निर्णय पूर्णपणे तर्कविसंगत वाटतो. अर्थात, गोलंदाजीतील वैविध्य आणि फलंदाजीला अधिक खोली देण्याचा यामागे संघ व्यवस्थापनाचा हेतू असू शकतो, मात्र तो पूर्णपणे फसला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने पर्थ कसोटी जिंकली होती. या सामन्यात जसप्रीत बुमराह कर्णधार होता. त्यावेळी रवींद्र जडेजाऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय फलंदाजी अधिक मजबूत करण्यासाठी होता. या कसोटी सामन्यात बुमराह आणि इतर वेगवान गोलंदाजांनी विजयाची धुरा सांभाळली. त्यानंतर दिवस-रात्र कसोटीत (पिंक बॉल टेस्ट) अश्विनची निवड झाली. अखेर गाबामध्ये रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले. त्याने 77 धावांची खेळी केली आणि फिरकी गोलंदाजीतील हा गोंधळ थांबला. या मालिकेनंतर अश्विनने निवृत्ती जाहीर केली.
ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजी अपयशी ठरत होती. त्यामुळे फलंदाजीत खोली आणण्यासाठी वेगवान गोलंदाजीशी तडजोड करण्यात आली. नवव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आणि त्याने अर्धशतक झळकावले. शतकवीर नितीश कुमार रेड्डीच्या साथीने त्याने संघाची धावसंख्या 369 पर्यंत पोहोचवली. मात्र, गोलंदाजी कमकुवत झाल्याने जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडमध्ये प्रचंड वाढ झाली. फलंदाजीतील खोलीच्या नादात संपूर्ण दौऱ्यात बुमराहचा गरजेपेक्षा जास्त वापर झाला.
सिडनी कसोटीत बुमराहच्या पाठीची दुखापत पुन्हा बळावली आणि आता त्याचे परिणाम समोर आहेत. बुमराहचा वापर आता मर्यादित स्वरूपातच होऊ शकतो. इंग्लंड दौऱ्यावर तो केवळ 3 सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर एक नवखा संघ गेला आहे. लीड्समध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण थोडे अधिक चांगले झाले असते, तर विजय निश्चित होता. पहिल्यांदाच असे वाटले की, संघाने योग्य प्लेइंग 11 निवडली आहे, परंतु पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेबद्दल संभ्रमावस्था दिसून आली.
शार्दुल ठाकूर हा एक गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु लीड्समध्ये ज्या प्रकारे त्याचा गोलंदाजीत वापर झाला, ते पाहता असे वाटले की संघ व्यवस्थापनाला अष्टपैलू खेळाडूकडून फलंदाजी जास्त आणि गोलंदाजी मर्यादित हवी आहे. लीड्स कसोटीच्या दोन्ही डावांत पहिल्या 5 फलंदाजांनी धावा केल्या. मात्र, पहिल्या डावात 41 धावांत 7 बळी आणि दुसऱ्या डावात 31 धावांत 6 बळी गेले. हे पाहता, संघ व्यवस्थापन पुन्हा फलंदाजीतील खोलीचा विचार करू नये, अशी भीती आहे. संघात फलंदाजीमध्ये पुरेशी खोली आहे; गरज आहे ती 20 बळी घेण्याची. कारण 20 बळी घेतल्याशिवाय कसोटी सामना जिंकता येत नाही.