

IND vs ENG 2nd Test Kuldeep Yadav replacement for Bumrah Know Reason
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बुधवार, 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. लीड्स कसोटीत पराभव पत्करून मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे, या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता नाही. वर्कलोड व्यवस्थापनाअंतर्गत (Workload Management) बुमराह या दौऱ्यावर केवळ 3 कसोटी सामने खेळणार आहे, त्यापैकी एक सामना तो खेळला आहे. त्यामुळे आता तो केवळ दोनच सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. दरम्यान, गुरुवारी (26 जून) ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे म्हटले आहे.
भारतीय संघाकडे त्याच्या बदलीसाठी अत्यंत मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. संघ व्यवस्थापनाला आकाशदीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एका खेळाडूची निवड करावी लागेल. बुमराहच्या अनुपस्थितीत भारताची गोलंदाजी निश्चितच कमकुवत होईल.
मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी लीड्स कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. मात्र, त्यांना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घाईचा ठरू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. सध्या भारतीय संघ स्थित्यंतरातून जात असून भविष्याची गोलंदाजीची फळी तयार करणे, हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे एका सामन्यातील अपयशाकडे दुर्लक्ष करून या गोलंदाजांना सातत्यपूर्ण संधी देणे आवश्यक आहे.
बर्मिंगहॅम कसोटीत भारतीय संघाने प्लेइंग 11 मध्ये केवळ एक बदल करणे अपेक्षित आहे. एजबॅस्टनची परिस्थिती आणि खेळपट्टी पाहूनच बुमराहचा पर्याय निवडला गेला पाहिजे. येथील हवामानात उष्णता अधिक असणार आहे. 28 जून ते 1 जुलै दरम्यान तापमान 27 अंश सेल्सिअस ते 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे.
कसोटी सामन्यादरम्यान, 2 ते 6 जुलै या कालावधीत तापमान 21-22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे आणि पावसाची शक्यता नाही. अशा परिस्थितीत, खेळपट्टी कोरडी राहण्याची दाट शक्यता आहे. कोरड्या खेळपट्टीवर कुलदीप यादव अत्यंत प्रभावी ठरू शकतो. या चायनामन फिरकी गोलंदाजामध्ये बळी घेण्याची क्षमता आहे. तसेच त्याकडे सपाट खेळपट्टीवरही बळी मिळवण्याचे कौशल्य आहे. या मनगटी फिरकी गोलंदाजाने सात वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता, ज्यात लॉर्ड्सवर त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती.
मात्र, कुलदीप आता परिस्थितीवर अवलंबून राहणारा गोलंदाज राहिलेला नाही. तो आपल्या सुधारित ओव्हरस्पिन आणि उसळीच्या जोरावर इंग्लिश फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. इंग्लिश फलंदाजांकडे फिरकीचा सामना करण्यासाठी स्वीप आणि रिव्हर्स स्वीप हेच प्रमुख अस्त्र दिसते. बेन डकेटपासून ते बेन स्टोक्सपर्यंत सर्वच फलंदाज याचा वापर करतात. रवींद्र जडेजाविरुद्ध ही रणनीती यशस्वी ठरू शकते, परंतु कुलदीप यादवच्या फिरकीतील विविधतेसमोर ती अपुरी पडण्याची शक्यता आहे.
भारतातील धर्मशाला येथील परिस्थिती इंग्लंडसारखीच असते आणि तेथे त्याने 2024 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने त्या कसोटीच्या पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेतले होते.