द. आफ्रिकेच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची कसोटी | पुढारी

द. आफ्रिकेच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची कसोटी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ; भारतीय संघ कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. तीन सामान्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा 26 डिसेंबरला होणार आहे. ही मालिका विशेष महत्त्वाची आहे. कारण, दक्षिण आफ्रिका हा एकमात्र असा संघ आहे ज्यांच्या देशात भारताला 29 वर्षांत कोणतीच कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीवर स्विंग, गती आणि चेंडूला मिळणार्‍या उसळीमुळे भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागतो. दक्षिण आफ्रिकेच्या खेळापट्ट्या या नेहमी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणे राहिल्या आहेत. इंग्लंडमध्ये चेंडूला स्विंग आणि सीम मिळतो. तर, ऑस्ट्रेलियन मैदानावर चेंडूला अतिरिक्त उसळी मिळते. आफ्रिकेतील मैदानावर चेंडू स्विंग आणि सीम होण्यासोबत उसळीदेखील चांगली मिळते.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये भारताला यश

गेल्या काही वर्षांत भारताने परदेशात देखील चमकदार कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधले. भारतीय संघाने गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौर्‍यात कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला. इंग्लंड विरुद्ध यावर्षीदेखील संघाने चांगली कामगिरी करत छाप पाडली. भारतात चेंडूला उसळी मिळणार्‍या आणि सीम होणार्‍या खेळापट्ट्यांवर खेळण्याचा चांगला अनुभव मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेत त्याचा फायदा मिळू शकतो. 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतीय जलदगती गोलंदाजांनी एकूण 42 विकेटस् मिळवल्या आणि इंग्लंड दौर्‍यावर 61 विकेटस् आपल्या नावे केल्या.

द. आफ्रिकेत लेग स्पिनरची चमकदार कामगिरी

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक विकेटस् घेण्याच्या बाबतीत अव्वल पाच विदेशी गोलंदाजांमध्ये तीन स्पिनर्स येतात. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने 61 विकेटस् मिळवल्या. तर, अनिल कुंबळेने 45 आणि ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ग्रिमेटने 44 विकेटस् आपल्या नावे केल्या आहेत.

सध्याच्या भारतीय संघात मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन असेल. अश्विनने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि 46.14 च्या सरासरीने सात विकेटस् मिळवल्या आहेत.

अव्वल 20 फलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या अव्वल 20 जणांच्या यादीत केवळ एक बिगर आफ्रिकी फलंदाज आहे. इंग्लंडच्या वॉली हॅमंडने 15 सामन्यांत 1,447 धावा केल्या. तसेच, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हा एकमात्र असा फलंदाज आहे ज्याने आफ्रिकेत हजारहून अधिक धावा केल्या आहेत.

तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत 15 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 1,161 धावा केल्या. मात्र, सध्याच्या भारतीय संघातील विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

Back to top button