U19 World Cup : अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक!, सेमीफायनलमध्ये द. आफ्रिकेचा पराभव | पुढारी

U19 World Cup : अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक!, सेमीफायनलमध्ये द. आफ्रिकेचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 7 गडी गमावून 244 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 8 गडी गमावून 48.5 षटकांत 248 धावा करत विजयी लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. तिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

9 व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

19 वर्षांखालील भारतीय संघाने 9 व्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. याआधी 2000, 2006, 2008, 2012, 2016, 2018, 2020 आणि 2022 मध्ये ज्यूनिअर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला होता. यादरम्यान संघाने सर्वाधिक 5 वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ 2010 आणि 2014 मध्ये अनुक्रमे सहाव्या आणि पाचव्या स्थानावर राहिला होता, तर 1998 मध्ये संघ दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला होता.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 7 गडी गमावून 244 धावा केल्या. लुआन-ड्रे प्रिटोरियसने संघासाठी सर्वात मोठी खेळी (76) खेळली. त्याच्याशिवाय रिचर्ड सेलेटस्वेन (64) यानेही शानदार अर्धशतक झळकावले. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर मुशीर खानने 2 आणि नमन तिवारी, सौम्या पांडेने प्रत्येकी 1 बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. आणि अवघ्या धावांत चार फलंदाज तण्बूत परतले. इथून पुढे सचिन दास (96) आणि कर्णधार उदय सहारन (81) यांनी संयमी खेळ करत संघाचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भगिदारी केली.

नेपाळ विरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या सचिनने 95 चेंडूत 96 धावांची शानदार खेळी केली. त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचा स्ट्राईक रेट 101.05 होता. कर्णधार उदयसोबत त्याने 187 चेंडूत 171 धावांची भर घातली. या भागीदारीमुळेच भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला. सचिन या विश्वचषकात सर्वाधिक धावा (379) करणारा फलंदाज ठरला आहे.

उदय-सचिनचा विक्रम

या सामन्यात उदय आणि सचिनने 171 धावांची भागीदारी केली. अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघासाठी पाचव्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. त्यांनी रिकी भुई आणि सरफराज खान यांचा विक्रम मोडला. रिकी-सरफराजने 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 159 धावांची भागिदारी साकारली होती. तिसऱ्या क्रमांकावर मनीष पांडे आणि सौरभ तिवारीची जोडी आहे. त्यांनी 2008 च्या विश्वचषकात 148 धावांची भागीदारी केली होती.

Back to top button