National Games 2023 : २७ सुवर्णांसह गोव्याच्या पारड्यात तब्बल ९१ पदके  | पुढारी

National Games 2023 : २७ सुवर्णांसह गोव्याच्या पारड्यात तब्बल ९१ पदके 

पणजी; विठ्ठल गावडे पारवाडकर : गोव्यात पहिल्यांदाच आयोजित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला तब्बल ९१ पदके प्राप्त झाली. त्यात २७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील गोव्याची ही विक्रमी कामगिरी आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री व क्रिडामंत्र्याकडून खेळाडुंचे कौतुक करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी दुपारी ३.०० वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर स्पर्धेचा समारोप सोहळा होणार आहे.

संबंधित बातम्या : 

काही वर्षांपासून गोव्यातील आयोजनाबाबत वादात राहिलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना अखेर २५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केला होता. या स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंनी तब्बल ९१ पदके जिंकून क्रीडा क्षेत्रातही गोवा कमी नसल्याचे दाखवून दिले.

३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गतवर्षी गुजरातमध्ये पार पडल्या होत्या. या स्पर्धेत गोव्याच्या वाट्याला केवळ पाच कांस्यपदके आली होती. परंतु, यंदा गोव्याच्या खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध करत तब्बल २७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांवर कब्जा केला. सेपाक टकरॉ, योगासने, स्क्वॅश, बॉक्सिंग आदी क्रीडा प्रकारांमध्ये गोव्याच्या खेळाडूंनी सुवर्ण पदके जिंकत क्रीडा क्षेत्रात अव्वल असलेल्या अनेक राज्यांना मागे सोडले आहे. खेळाडूंच्या या कामगिरीचे राज्यभरातून कौतुक होत आहे. सद्यस्थितीत पदकतालिकेत गोवा पहिल्या दहा राज्यांमध्ये आहे. परंतु, अद्याप दोन स्पर्धांचे निकाल हाती येणे बाकी असल्यामुळे स्पर्धेत गोवा कितव्या स्थानी राहतो, हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील साखळी सामन्यांना १९ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. तर, २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फातोर्डा मैदानावर स्पर्धेचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेसाठी देशभरातील ११ हजारांपेक्षा अधिक खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी गोव्यात हजेरी लावली. राज्य सरकारने या सर्वांनाच आवश्यक त्या सर्व साधनसुविधा वेळेत पोहोचवल्याबद्दल, तसेच खेळाडूंची सर्वच बाबतीत काळजी घेऊन स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल विविध राज्यांचे खेळाडू आणि तेथील क्रीडा खात्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंनी जी चमक दाखवली, त्यातून क्रीडा क्षेत्रातही गोवा अव्वल बनू शकतो, हा विश्वास निर्माण झाला आहे. आगामी​ काळात खेळाडूंसाठी आणखी दर्जेदार साधनसुविधा निर्माण करून आणि योग्य प्रशिक्षणाची व्यवस्था करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करण्याचा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button