पणजी; विवेक कुलकर्णी : सध्या गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वप्रथम 200 पदकांचा अनोखा माईलस्टोन सर केला आणि स्पर्धेच्या सांगता सोहळ्याला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी बाकी असताना यंदाच्या आवृत्तीत आपणच अनभिषिक्त सम्राट असू, याचीच जणू नांदी दिली. या देदीप्यमान यशामुळे गोव्याच्या भूमीत 'गर्जे महाराष्ट्र माझा'चा खर्या अर्थाने आता दुमदुमला आहे.
संबंधित बातम्या :
फातोर्डा स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत 26 ऑक्टोबर रोजी शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर विविध इव्हेंटस्ना सुरुवात झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राने जवळपास प्रत्येक दिवशी पदकतालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित करत साम्राज्य उभे केले. सोमवारी दिवसअखेर 199 पदकांवर असलेल्या महाराष्ट्राने मंगळवारी प्रारंभिक टप्प्यातच ट्रायथलॉन मिश्र रिलेत पदक जिंकत 200 पदकांचा माईलस्टोन सर केला.
यावेळी मिरामार बीचवर सुरू झालेल्या ट्रायथलॉन मिश्र रिलेमध्ये मानसी मोहितेने जवळपास दोन मिनिटांची पिछाडी भरून काढत विद्यमान विजेत्या तामिळनाडूला मागे टाकले आणि येथे महाराष्ट्राला यामुळे सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करता आले. मानसी मोहितेसाठी हे पाचवे सुवर्ण ठरले. यापूर्वी रविवारी जिंकलेल्या वैयक्तिक गटातील सुवर्णपदकाप्रमाणे मॉडर्न पेंटाथलॉनमधील बायथल इव्हेंटमध्येही तिने 3 सुवर्णपदके काबीज केली आहेत.
सुवर्णजेत्या संघातील सहकारी पार्थ मिरगेनेदेखील 4 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य अशी 6 पदके यंदा मिळवली. मंगळवारी महाराष्ट्राच्या खात्यावर 70 सुवर्ण, 64 रौप्य व 69 कांस्य अशी एकूण 203 पदके नोंद होती. विद्यमान विजेते सेनादल 55 सुवर्ण पदकांसह दुसर्या स्थानी होते, तर हरियाणाने 50 सुवर्णपदकांसह दुसर्या क्रमांकासाठी जोरदार संघर्ष सुरूच ठेवला होता.
या स्पर्धेतील मंगळवारच्या काही इव्हेंटस्मध्ये पश्चिम बंगालच्या मेहुली घोषने महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफलमध्ये सुवर्ण जिंकले. हरियाणाची नॅन्सी रौप्य, तर पश्चिम बंगालचीच आणखी एक नेमबाज स्वाती चौधरी कांस्यपदकाची मानकरी ठरली. पंजाबची राजेश्वरी कुमारीने महिलांच्या ट्रॅप इव्हेंटमध्ये, तर गुजरातच्या मलेकने पुरुषांच्या इव्हेंटमध्ये पहिल्या दोन फेर्यांअखेर आघाडी प्राप्त केली होती. शापोरा नदीवर सुरू असलेल्या स्लॅलोम इव्हेंटमध्ये मध्य प्रदेशने चारही सुवर्ण जिंकत एककलमी वर्चस्व प्रस्थापित केले.
महिला हॉकीत हरियाणाने पंजाबला नमवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता बुधवारी होणार्या फायनलमध्ये त्यांची लढत मध्य प्रदेशविरुद्ध रंगणार आहे. मध्य प्रदेशने आणखी एका उपांत्य लढतीत झारखंडला पराभवाचा धक्का दिला. पुरुषांच्या उपांत्य फेरीत कर्नाटकने महाराष्ट्राचा 5 विरुद्ध 4 फरकाने पराभव केला. आता त्यांची सुवर्णपदकासाठी हरियाणाविरुद्ध लढत होईल. हरियाणाने आणखी एका लढतीत उत्तर प्रदेशला नमवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
हेही वाचा :