AFG vs AUS : अफगाणिस्तानचे ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे लक्ष्य | पुढारी

AFG vs AUS : अफगाणिस्तानचे ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे लक्ष्य दिले आहे. फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. इब्राहिम झद्रानने 143 चेंडूत शानदार 129 धावा केल्या तर राशिद खानने 18 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी केली. अखेरीस इब्राहिम आणि रशीद यांनी सहाव्या विकेटसाठी २८ चेंडूत ५८ धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकात 64 धावा कुटल्या. (AFG vs AUS )

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. रहमानउल्ला गुरबाज 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम झद्रान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. रहमत 30 धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर इब्राहिमने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. शाहिदी २६ धावा करून बाद झाला. अजमतुल्ला उमरझाईही 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद नबी 12 धावा करू शकला. दरम्यान, इब्राहिमने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. (AFG vs AUS )

इब्राहिमने 143 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 129 धावा करून नाबाद राहिला. तर राशिदने 18 चेंडूत 35 धावांच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

संघातील बदल

विश्‍वचषक स्‍पर्धेत अफगाणिस्तानचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या पाचपैकी चार सामने या संघाने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग पाच सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन्‍ही संघांसाठी आजचा सामना महत्त्‍वपूर्ण आहे.

अफगाणिस्‍तानने आपल्‍या संघात फजलहक फारुकीच्या जागी नवीन उल हकला खेळवणार आहे. तर ऑस्ट्रेलियाच्‍या संघात ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्शचे पुनरागमन झाले आहे. आजच्‍या सामन्‍यात कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्ह स्मिथ खेळणार नाहीत. स्मिथला दुखापत झाली आहे.

अफगाणिस्तानसमोर धावांची गती वाढवण्‍याचे आव्‍हान

अफगाणिस्तानने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे, परंतु गेल्या पाचपैकी चार सामने जिंकल्यामुळे त्यांच्या संघाचे मनोबलही उंचावले आहे. अफगाणिस्तानला उपांत्‍य फेरी गाठण्‍यासाठी पुढील दोन सामने जिंकण्‍याबरोबरच धावांच्‍या गतीवरही द्यावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग-11 : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (यष्‍टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.

अफगाणिस्तान प्लेइंग-11 : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक.

हेही वाचा : 

Back to top button