Sri Lanka Cricket Board : श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय रद्द

Sri Lanka Cricket Board : श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sri Lanka Cricket Board : विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी (दि. 6) आपल्या देशाच्या क्रिकेट बोर्डच बरखास्त केले. या कारवाईनंतर बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी क्रीडामंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली, जी न्यायालयाने सुनावणीसाठी स्वीकारली. मंगळवारी (दि.7) कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत क्रीडा मंत्र्यांचा निर्णय रद्द केला आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड कायम राहिल हे स्पष्ट केले. तसेच संपूर्ण सुनावणी होईपर्यंत हकालपट्टी केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश दिले.

हकालपट्टी केलेले अधिकारी पुन्हा कामावर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेच्या कोर्ट ऑफ अपीलने देशाच्या क्रिकेट बोर्डाला बरखास्त करण्याचा क्रीडामंत्र्यांचा निर्णय रद्द केला असून सुनावणी पूर्ण होईपर्यंत हकालपट्टी केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर ठेवले आहे. एका न्यायालयीन अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय दोन आठवड्यांसाठी आहे, त्यानंतर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल. (Sri Lanka Cricket Board)

भारताकडून 302 धावांनी झालेल्या नामुष्कीजनक पराभवानंतर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते. त्यानंतर सोमवारी रणसिंगे यांनी माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची अंतरिम समिती नेमली होती. त्यानंतर रणतुंगा म्हणाले होते की, 'श्रीलंका क्रिकेट बोर्ड ही देशातील सर्वात भ्रष्ट संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली आहे आणि मला ती प्रतिमा बदलायची आहे.' पण कोर्टाने मंगळवारी क्रीडा मंत्र्यांचा निर्णय रद्द केला आणि विद्यमान बोर्ड दोन आठवड्यांसाठी कायम राहिल असे सांगितले. त्यामुळे 1996 मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणाऱ्या रणतुंगा यांना एका दिवसात अध्यक्षपद गमवावे लागले. (Sri Lanka Cricket Board)

श्रीलंकेने 2 सामने जिंकले आणि 6 गमावले

श्रीलंका आठ सामन्यांत दोन विजयांसह 4 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेने 102 धावांनी, पाकिस्तानने 6 विकेट्सने, ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सने, अफगाणिस्तानने 7 विकेट्सने, भारताने 302 धावांनी आणि बांगलादेशने 3 विकेट्सने पराभव केला. श्रीलंकेने नेदरलँड्सचा 5 विकेट्सने तर इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news