Glenn Maxwell : वेदनांनी त्रस्त मॅक्सवेलला ‘रनर’ का मिळाला नाही? जाणून घ्या कारण | पुढारी

Glenn Maxwell : वेदनांनी त्रस्त मॅक्सवेलला 'रनर' का मिळाला नाही? जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 10 नोव्हेंबर रोजी आपल्या ऐतिहासिक आणि संघर्षपूर्ण खेळीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या वानखेडे मैदानावर ऑस्ट्रेलियाची 91 धावांवर पडझड झाली होती. त्यांचे सात फलंदाज तंबूत परतले होते. यानंतर मॅक्सवेलने (Glenn Maxwell) एकहाती खेळी करत 128 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांसह 201 धावांची ऐतिहासिक खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान मॅक्सवेल पाठीदुखीचा त्रास सुरू झाला, तसेच पायात पेटकेही आले. त्याला वेदना होत होत्या. विकेटवर धावा काढणे त्याच्यासाठी कठीण झाले होते. अनेक वेळा तो मैदानावर आडवा झाला. त्याच्याजवळ पंच आले आणि त्यांनी मॅक्सवेलची विचारपूस केली. पण असे असूनही त्याला रनर घेता आला नाही. असे का झाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

वास्तविक, फलंदाजी करताना पायात आलेल्या क्रॅम्पमुळे मॅक्सवेलला (Glenn Maxwell) केवळ फलंदाजीतच नाही तर चालण्यातही अडचणी येत होत्या. एकवेळ असे वाटत होते की मॅक्‍सवेल रिटायर्डहर्ट होईल. झाम्पा सीमारेषेजवळ येऊन उभा राहिला होताच. मात्र असे काहीही झाले नाही आणि सर्व संकटांना तोंड देत संघाला विजय मिळवून देईपर्यंत तो मैदानातून बाहेर पडला. मॅक्सवेलच्या या लढाऊ खेळीमुळे क्रिकेट विश्वात त्याच्या स्पिरिटची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने केवळ सामनाच जिंकला नाही तर विश्वचषकाची उपांत्य फेरीही गाठली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही मॅक्सवेलला भक्कम साथ दिली आणि तो 68 चेंडूत केवळ 12 धावा करून नाबाद माघारी परतला. यावेळी त्याने विकेट सुरक्षित ठेवली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकात 7 विकेट गमावत 293 धावा करत सामना जिंकला.

‘रनर’ म्हणजे काय आणि त्याचा वापर कधीपासून थांबला?

क्रिकेटमध्ये चौकार, षटकारांप्रमाणेच एकेरी आणि दुहेरी धावा महत्त्वाच्या असतात. खेळपट्टीवर दोन फलंदाजांपैकी एकाला दुखापतीमुळे धाव घेणे कठीण जाते त्यावेळी रनरचा पर्याय वापरला जातो. हा रनर त्याच संघातील खेळाडू असायला असायला हवा. पण 2011 पासून आयसीसीने हा नियम बदलला आहे. आयसीसीच्या नियमानुसार फलंदाज जखमी झाला आणि तो धावू शकत नसेल तर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागेल. हा निर्णय शिफारशींचा एक भाग होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की यामुळे खेळामध्ये खूप व्यत्यय येतो आणि वेळ वाया जातो. परिणामी मॅक्सवेलला (Glenn Maxwell) धावायला त्रास होत होता, तरीही त्याला रनर घेता आला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Back to top button