ICC World Cup AUS vs SL : श्रीलंकेचा डाव 209 धावांत गुंडाळला, कांगारूंपुढे 210 धावांचे लक्ष्य | पुढारी

ICC World Cup AUS vs SL : श्रीलंकेचा डाव 209 धावांत गुंडाळला, कांगारूंपुढे 210 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन : ICC World Cup AUS vs SL : वर्ल्डकप 2023 च्या 14 व्या सामन्यात आज (सोमवार) ऑस्‍ट्रेलियाचा सामना श्रीलंकेसोबत होत आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर (इकाना) हा सामना रंगला आहे.

श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला

ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला. लंकन संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका 61 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर कुसल मेंडिस 78 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ 209 धावांवर गडगडला.

निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित अस्लंकाला दुहेरी आकडा गाठता आला. त्याने 25 धावा केल्या. दासून शनाका वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणा-या कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा सदीरा समरविक्रमा आठ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वा सात आणि लाहिरू कुमारा चार धावा करून माघारी परतले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेललागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महिशला तिक्षाणाला तर खातेही उघडता आले नाही. तर, दिलशान मदुशंका खाते न उघडता नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन बळी मिळवण्यात यश आले. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली.

संबंधित बातम्या

सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले

ऑस्‍ट्रेलिया आणि श्रीलंका यांनी आपले सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. गुणतक्‍त्‍यात ऑस्‍ट्रेलियाचा संघ 10व्या स्‍थानावर आहे. तर श्रीलंका 8व्या स्‍थानावर आहे.

श्रीलंकेचा कर्णधार शनाका वर्ल्ड कपमधून बाहेर

या सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. 10 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शनाकाला दुखापत झाली होती. त्याच्या जागी अष्टपैलू चमिका करुणारत्नेचा संघात समावेश करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, शनाकाच्या अनुपस्थितीत कुसल मेंडिसकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

दोन्ही संघांचा तिसरा सामना

या विश्वचषकात दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. पाचवेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. कांगारू संघाचा पहिल्या सामन्यात भारताकडून तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पराभव केला होता. दुसरीकडे श्रीलंकेला पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रेलिया संघ : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

श्रीलंका संघ : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, लाहिरू कुमारा, दिलशान मधुशानका

 

Back to top button