आशिया चषकाचा ड्रॉ फिक्स; श्रीलंकेचा माजी खेळाडू चरिथ सेनानायके याचा आरोप | पुढारी

आशिया चषकाचा ड्रॉ फिक्स; श्रीलंकेचा माजी खेळाडू चरिथ सेनानायके याचा आरोप

कोलंबो : वृत्तसंस्था आशिया चषक स्पर्धेचा ड्रॉ हा भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल व्हावी, याद़ृष्टीने आखल्याचा दावा श्रीलंकेचा माजी खेळाडू चरिथ सेनानायके याने केला आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले, तरी भारतासोबतच्या संबंधांमुळे त्यांना 9 सामने श्रीलंकेत खेळवावे लागले. मात्र, श्रीलंकेत आशिया चषक खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरतोय. पावसामुळे आशिया चषक स्पर्धेतील बर्‍याच लढतींमध्ये अडथळा निर्माण केला.

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सुपर-4 लढतीसाठी राखीव दिवस ठेवला गेला. परंतु, श्रीलंकेच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेलेला नाही. फायनलसाठीही राखीव दिवस नसल्याने पावसामुळे रविवारी सामना न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल. हाच मुद्दा पकडून सेनानायके याने खळबळजनक दावा केला आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेचा ड्रॉ फिक्स असल्याचा दावा केला आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना सेनानायके म्हणाला, स्पर्धेपूर्वीच येथील वातावरण कसे असेल, याची माहिती आयोजकांना होती आणि त्याची कल्पना सर्व संघांनाही होती. त्यामुळे जोपर्यंत सर्व संघांची सहमती नसेल, तर नियम बदलता येत नाही; अन्यथा त्याला रडीचा डाव म्हणावे लागेल. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला राखीव दिवस हवा होता, तर स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्येकाला भारत-पाकिस्तान फायनल हवी आहे आणि त्यासाठी ड्रॉ तयार केला गेला आहे. तुम्ही एका क्रिकेट बोर्डासाठी एक न्याय अन् इतरांसाठी दुसरा, असे करू शकत नाही.

Back to top button