IND vs PAK : विजयाची ‘कँडी’ कोण चाखणार? | पुढारी

IND vs PAK : विजयाची ‘कँडी’ कोण चाखणार?

- निमिष पाटगावकर

आशिया चषक असो वा विश्वचषक असो जोपर्यंत भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढत होत नाही, तोपर्यंत त्या स्पर्धेला खर्‍या अर्थाने सुरुवात होत नाही. लिंबूटिंबू नेपाळ, श्रीलंका, बांगला देश या संघांची नांदी झाल्यावर आज भारत-पाकिस्तान महानाट्याचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. पहिला प्रयोग याच्यासाठी म्हणतोय की, स्पर्धेचा फॉरमॅट असा आहे की, भारत-पाकिस्तान तीनदा या आशिया चषकात एकमेकांसमोर भिडायची शक्यता आहे. यजमान पाकिस्तानने नेपाळी शेर्पांना क्रिकेटमधला एव्हरेस्ट विजय कसा असतो, हे दाखवल्यावर भारताशी दोन हात करायला ते ‘कँडी’ला पोहोचले आहेत, तर भारतीय संघ बंगळूरजवळ अलूरचे सराव शिबिर संपवून लंकेत पोहोचला आहे.

दोन्ही संघांच्या 17 खेळाडूंतून आजच्या लढतीसाठी 11 निवडायचे, तर भारताची डोकेदुखी जास्त आहे. जेव्हा मुबलक उत्तम पर्यायातून तुम्हाला संघ निवडायचा असतो तेव्हा डोकेदुखी चांगली असते; पण जेव्हा संघ निवड ही फॉर्मची किंवा फिटनेसची अनिश्चितता यावर ठरत असते तेव्हा ती डोकेदुखी ठरते. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न, पाच गोलंदाज का फलंदाजी मजबूत करायला एक जादा फलंदाज, फिरकीपटू कोण हे प्रश्न जसे इतके उपाय करून पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा का होते? सारखेच अनुत्तरित आहेत. सामना हा दोन संघांत जरी असला, तरी या महायुद्धामध्ये अजून छोट्या लढाया लपलेल्या असतात. शाहिन आफ्रिदी-रोहित शर्मा, कोहली-रौफ, बाबर आझम-बुमराह किंवा कोहली-बाबर आझम या प्रमुख छोट्या लढाया. जो संघ जास्त छोट्या लढाया जिंकतो तोच महायुद्धाचा विजेता ठरतो.

भारताची सलामी कशी होते यावर खूप काही अवलंबून असेल. आपल्या पहिल्या स्पेलमध्येच प्रतिस्पर्धी संघाचे दोन-तीन महत्त्वाचे बळी टिपत सामन्यात पाकिस्तानला वर्चस्व मिळवून द्यायचे कसब आफ्रिदीत आहे, तेव्हा ती लढाई पहिली जिंकावी लागेल. यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत ते रोहित शर्मा-शुभमन गिल, रोहित शर्मा-इशान किशन. यात रोहित शर्माने2018-19 च्या आशिया चषकाच्या सामन्यात (आफ्रिदी-अमीर समोर) 2019 च्या विश्वचषकाच्या सामन्यात ओल्ड ट्रॅफर्डला (मो. अमीर समोर) जरी शतके झळकावली असली तरी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा एकंदरीत विचार करता डावखुर्‍या वेगवान गोलंदाजांनी त्याला कायमच सतावले आहे. अलीकडच्या काळात रोहित शर्माचे वेगवान मार्‍याविरुद्धचे फुटवर्क त्या वेगाशी स्पर्धा करण्यात कमी पडते. अ‍ॅक्रॉस होऊन खेळताना एक तर पायचीत किंवा आऊटस्विंग बॅटची कड घेऊन जायची शक्यता आहे. दुसरीकडे शुभमनगिलचेही डावखुर्‍या जलदगती गोलंदाजीसमोरचे फुटवर्क त्याला चेंडू अंगापासून दूर खेळायला भाग पडते आणि स्लिपमध्ये झेल उडतात. (IND vs PAK)

संघातील इशान किशनच्या समावेशाने सलामीला अजून एक पर्याय उपलब्ध आहे. इशान किशनला कुठच्या क्रमांकावर खेळवायचे हाही संघ व्यवस्थापनापुढे प्रश्न आहे. इशान किशनचे सलामीचा फलंदाज म्हणून यश आणि अनुभव बघितला, तर किशन-गिल हाही सलामीचा धडाकेबाज पर्याय होऊ शकतो. हे व्हायची शक्यता कमी आहे; पण यामुळे मधल्या फळीला आपोआप बळकटी मिळते. विराट कोहलीकडे डावाचे सुकाणू असेल. कोहली-रौफ सामन्यात गेल्या टी-20 विश्वचषकात कोहलीने बाजी मारली होती; पण रौफचे यॉर्कर्स आणि आखूड टप्प्याचा चकित करणारा वापर कोहलीला त्रासदायक ठरू शकतात. तंदुरुस्त होऊन संघात परतलेल्या श्रेयस अय्यरला निवडीत प्राधान्य मिळेल; पण कुठच्याच सामन्याचा सराव नसलेला अय्यर का वेस्ट इंडिज दौर्‍यात शेवटी सूर गवसलेला सूर्यकुमार यादव हाही संघ निवडीची डोकेदुखी आहे. तिलक वर्माचा या मोठ्या सामन्याला विचार होईल वाटत नाही. रोहित, गिल, किशन, अय्यर, पंड्या आणि जडेजा हे नक्की मानले, तर सूर्यासाठी संघात स्थान उरत नाही. या सहांबरोबर बुमराह, शमी, सिराज हेही संघात असतील. आता उरलेल्या दोन जागांसाठी शार्दूल, कुलदीप, अक्षर, प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी कुलदीपची निवड नक्की मानायला हरकत नाही. शेवटच्या स्थानासाठी खेळपट्टी, हवामान बघून अक्षर किंवा शार्दूल यांचा विचार होईल. या दोघांकडून गरज पडल्यास फलंदाजीचीही अपेक्षा ठेवू शकतो.

पाकिस्तानच्या संघाची निवड त्या मानाने सोपी आहे. सलामी, मधली फळी, फिरकी आणि वेगवान मार्‍याचे त्रिकूट यात एखाद दुसरा बदल संभवतो. फकर झमान आणि इनाम-उल-हक सलामीला असतील, त्यानंतर बाबर आझम, रिझवान, सलमान, इफ्तेकार अहमद, हॅरिस आणि शादाब असतील. नसीम शाह, रौफ आणि आफ्रिदी त्रिकूट नवा चेंडू सांभाळतील. शादाब आणि मोहम्मद नवाझ फिरकी मारा सांभाळतील. पाकिस्तानी संघात अष्टपैलूंचा भरणा आहे, तेव्हा काही षटके भरून काढायला खूप पर्याय आहेत. शाहिन आफ्रिदी नेपाळविरुद्धच्या सामन्यात पाच षटके टाकून बाहेर गेला; पण त्याच्या दुखापतीबाबत अजून काही अधिकृत घोषणा नाही. पाकिस्तानची फलंदाजी फकर झमान, बाबर, रिझवान आणि इफ्तेकार यांच्यामुळे नक्कीच बलवान आहे. बाबर आझम विरुद्ध आपले गोलंदाज हे युद्ध या सामन्याचा निकाल ठरवण्यात महत्त्वाचे आहे. आपल्या कोहलीकडे जसे डावाचे सुकाणू आहे तसे पाकिस्तानचे सुकाणू बाबर आझमच्या हातात आहे. प्रथम फलंदाजी घेणार्‍या संघाचा डाव कसा बहरतो हे आपापल्या संघासाठी या दोघांच्या हातात आहे. (IND vs PAK)

सामन्याच्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत क्रिकेट खेळणे हा पावसाशी खेळलेला जुगारच आहे. या मैदानात आतापर्यंत झालेल्या 33 सामन्यांपैकी फक्त 3 सामने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये खेळले आहेत. आज 91 टक्के पावसाची शक्यता आहे; ती खरी झाली, तर सामना व्हायची शक्यताच मावळते. भारत-पाकिस्तान संघांत युद्धे ही कागदावर, मीडियात, मैदानाबाहेर पहिली खेळली जातात. मैदानावरच्या या युद्धात पाकिस्तानचा संघ कांकणभर जास्त समतोल वाटतो; पण आपल्या बेभरवशाच्या कामगिरीने आजवर भारतापुढे अनेकदा नांगी टाकल्याचा इतिहास आहे. आजचा आणि संभाव्य पुढचे दोन पाकिस्तानविरुद्धचे सामने हे 14 ऑक्टोबरच्या महासंग्रामाची पूर्वतयारी असली, तरी पाकिस्तानला डोके वर न काढून द्यायला आज जिंकायलाच हवे. सामन्याचे ठिकाण ‘कँडी’ या नावासारखे गोड असले, तरी भारत-पाकिस्तान हा सामना कायम तिखट जाळच असतो.

Back to top button