NZ vs SL : अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाने वाढले टीम इंडियाचे टेन्शन | पुढारी

NZ vs SL : अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाने वाढले टीम इंडियाचे टेन्शन

ख्राईस्टचर्च, वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या (NZ vs SL) कसोटी सामन्यात अँजेलो मॅथ्यूजने शानदार शतक झळकावून श्रीलंकेच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. श्रीलंकेचा संघ पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात 302 धावा करू शकला. त्याने पहिल्या डावात 355 धावा केल्या होत्या. त्याचवेळी यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात 373 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारून अल्पशी आघाडी मिळवली होती, त्यामुळे आता किवी संघाला 285 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसअखेरीस त्यांनी 1 बाद 28 धावा केल्या आहेत.

सोमवारी शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला (NZ vs SL) विजयासाठी आणखी 257 धावा करायच्या आहेत. त्याचवेळी श्रीलंकेचा संघ विजयापासून 9 विकेट दूर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी श्रीलंकेला मालिकेतील दोन्ही सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी चौथी कसोटी किमान अनिर्णीत राहावी, अशी प्रार्थनाही त्याला करावी लागेल.

सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेने दुसर्‍या डावात 3 बाद 83 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. अँजेलो मॅथ्यूज 20 आणि प्रभात जयसूर्या 2 धावांवर नाबाद होते. जयसूर्या 6 धावा करून बाद झाला. यानंतर मॅथ्यूज आणि दिनेश चंडिमल यांनी 5व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत धावसंख्या 200 धावांपर्यंत पोहोचवली. चंडिमल 42 धावा करून बाद झाला. धनंजय डिसिल्वाने नाबाद 47 धावा केल्या. संपूर्ण संघ 105.3 षटकांत 302 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या नंबर-1 वर आहे. तो फायनलसाठीही पात्र झाला आहे. भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह दुसर्‍या तर श्रीलंकेचा संघ 53.33 टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर अंतिम फेरीत पोहोचेल आणि श्रीलंका संघ बाहेर पडेल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया जिंकेल किंवा सामना अनिर्णीत राहील तेव्हाच श्रीलंकेच्या आशा कायम राहतील.

Back to top button