‘अशा’ खेळपट्ट्यांमुळे टी-20 ची मजा जाईल : पारस म्हांब्रे | पुढारी

‘अशा’ खेळपट्ट्यांमुळे टी-20 ची मजा जाईल : पारस म्हांब्रे

लखनौ, वृत्तसंस्था : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना सहा गडी राखून जिंकला. लखनौच्या इकाना स्टेडियमवर दोन्ही संघ धावा करण्यासाठी संघर्ष करत होते. येथील खेळपट्टीवर सातत्याने टीका होत आहे. सामन्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या लखनौच्या खेळपट्टीवर निराश दिसला. तो म्हणाला की, ती खेळपट्टी टी-20 क्रिकेटसाठी योग्य नाही. आता टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनीही याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, टी-20 साठी अशी खेळपट्टी करणे म्हणजे खेळाची मजा घालवण्यासारखे आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 19.5 षटकांत 4 गडी गमावून 101 धावा करून सामना जिंकला. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये 1 फेब्रुवारीला होणार आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान पारस म्हांब्रे म्हणाले, खेळपट्टीबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी क्युरेटर हा योग्य व्यक्ती आहे; परंतु नक्कीच आम्हाला माहीत होते की हे एक मोठे आव्हान असेल आणि सुदैवाने आम्ही खेळावर नियंत्रण ठेवले. 120-130 चे लक्ष्य आव्हानात्मक आहे. आम्ही त्यांना 99 पर्यंत मर्यादित ठेवणे चांगले केले आणि ते एक साध्य करण्यायोग्य लक्ष्य होते.

म्हांब्रे पुढे म्हणाले की, खेळपट्टी सुरुवातीपासूनच आव्हानात्मक दिसत होती. आम्ही खेळपट्टी पाहिली तेव्हा कळले की ती कोरडी आहे. मधोमध थोडे गवत होते, पण दोन्ही टोकाला काहीच नव्हते. काल आलो तेव्हा चेंडू खूप वळण घेईल असे वाटत होते. खरे तर अशी खेळपट्टी ही कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात येते. टी-20 साठी अशी खेळपट्टी करणे म्हणजे त्याची मजा घालवण्यासारखे आहे.

खेळपट्टी वेळेत तयार करावी : हार्दिक

कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, अपेक्षेपेक्षा ही धक्कादायक खेळपट्टी होती. मात्र, आम्हाला खेळपट्टीची फारशी काही तक्रार नाही. कुठल्याही परिस्थितीसाठी सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, पण ही खेळपट्टी टी-20 क्रिकेटसाठी बनलेली नाही, हे मात्र नक्की. क्युरेटर्स किंवा आम्ही ज्या ठिकाणी खेळणार आहोत त्यांनी हे पाहावे की ते खेळपट्ट्या वेळेत तयार कराव्यात. याशिवाय मी इथल्या प्रत्येक गोष्टीत खूप आनंदी आहे.

पारसने गोलंदाजांचे केले कौतुक

मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज पारस म्हांब्रेने दुसर्‍या सामन्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल गोलंदाजांचे कौतुक केले. युजवेंद्र चहलच्या रूपाने अतिरिक्त फिरकीपटूसाठी भारताला वेगवान गोलंदाज उमरान मलिकला सोडावे लागले. चहलने दोन विकेटस् घेतल्या. त्याच्यासह अन्य तीन फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि दीपक हुडा यांनीही टिच्चून गोलंदाजी करताना प्रत्येकी एक बळी घेतला.

Back to top button