Ranji Trophy : ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्र सावरला | पुढारी

Ranji Trophy : ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्र सावरला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात सामना खेळवला जात आहे. भारतीय संघातून वगळल्यानंतर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने आपला मोर्चा देशांतर्गत क्रिकेटकडे वळवला आहे. तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक ठोकून ऋतुराजने महाराष्ट्राच्या संघाला सावरले. तत्पूर्वी, तामिळनाडूने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

ऋतुराजने सुरुवातीपासून शानदार खेळी केली, मात्र दुसरीकडे तामिळनाडूने महाराष्ट्राच्या कोणत्याच फलंदाजाला जास्त काळ टिकू दिले नाही. ऋतुराज गायकवाड 126 चेंडूंत 118 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. मात्र, केदार जाधव (56) आणि अंकित बावणे (45) धावा करून तंबूत परतले, तर अजीम काझी नाबाद (87) धावा करून आपल्या सलामीवीराची साथ देत आहे. ऋतुराजने 3 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने पहिल्या दिवशी सामन्यात पकड बनवली. (Ranji Trophy)

ऋतुराज गायकवाडच्या वादळी खेळीला रोखण्यात कोणत्याच तामिळनाडूच्या गोलंदाजाला यश आले नाही. ऋतुराज पहिल्या दिवसअखेर खेळपट्टीवर टिकून राहिला आणि महाराष्ट्राच्या संघाने 83 षटकांत 6 बाद 350 धावा केल्या आहेत. तामिळनाडूकडून लक्ष्मीनारायण विघ्नेशने सर्वाधिक 2 बळी पटकावले, तर संदीप वारियर, रविश्रीनिवासन साई किशोर आणि विजय शंकर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

Back to top button