टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्डकप’; श्रीलंकेविरुद्ध आज पहिला वन-डे | पुढारी

टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्डकप’; श्रीलंकेविरुद्ध आज पहिला वन-डे

गुवाहाटी; वृत्तसंस्था :  भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज, मंगळवारी (दि. 10) खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना संघाच्या प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार की नाही, हा चिंतेचा विषय बनला आहे. या वन-डेच्या माध्यमातून भारतीय संघ भारतात या वर्षअखेरीस होणार्‍या आयसीसी वर्ल्डकपची तयारी करणार आहे.

वन-डे मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी यांसारखे खेळाडू पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहेत. संघाचा कर्णधार रोहित युवा उत्साही आणि अनुभवी खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळेल, अशी आशा आहे, पण या मालिकेतील पहिल्या सामन्यात प्लेईंग 11 निवडणे कर्णधारासाठी सर्वात कठीण काम असेल.

इशान कट्ट्यावर, गिलला संधी : रोहित शर्मा

ईशान किशन श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार नसल्याचे समोर आले आहे. खुद्द संघाचा कर्णधार रोहित शर्मानेच याबाबत धक्कादायक विधान केले आहे. शुभमन गिलला पूर्ण संधी द्यावी लागेल आणि या कारणामुळे इशान प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असेल, असे भारतीय कर्णधाराने म्हटले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहितने आपले म्हणणे मांडले.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचा भाग नव्हता. इशानने शिखर धवनसोबत डावाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर फॉर्मशी झगडणार्‍या धवनला संघातून वगळण्यात आले आहे. आता इशानला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण करणार्‍या शुभमन गिलने 15 डावात 57 च्या सरासरीने आणि 99 च्या स्ट्राइक रेटने 687 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. दुसरीकडे, इशान 2021 मध्ये भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्याने 9 डावात 53 च्या सरासरीने आणि 112 च्या स्ट्राईक रेटने 477 धावा केल्या आहेत. त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

आकडेवारीत इशानचा वरचष्मा

इशान किशनने पदार्पण केल्यापासून एक वेगळी छाप सोडली आहे. स्फोटक फलंदाजीसाठी तो जगभर प्रसिद्ध आहे. इशानने भारतासाठी फक्त 10 वन-डे सामन्यांमध्ये 111.97 च्या स्ट्राईक रेटने आणि 53 च्या सरासरीने 477 धावा केल्या आहेत. अलीकडेच त्याने बांगला देशविरुद्धच्या वन-डे सामन्यात 210 धावांची इनिंग खेळली होती. दुसरीकडे राहुलचे आकडे दिवसेंदिवस खराब होत आहेत. तो गेल्या 10 वन-डे सामन्यांत 27.88 च्या सरासरीने आणि 87.86 च्या स्ट्राईक रेटने केवळ 251 धावा जमा करू शकला आहे. यादरम्यान त्याने केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत आकडेवारीचा विचार केल्यास कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला वगळले तर तो त्याच्यावर अन्याय होईल, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गुवाहाटीमध्ये रोहित-विराटचे मोठे पोस्टर

भारत-श्रीलंका एकदिवसीय सामन्यासाठी गुवाहाटी किती उत्साही आहे, याचा अंदाज तेथे लावलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मोठ्या पोस्टर्स आणि होर्डिंग्जवरून लावला जाऊ शकतो. या तयारीनंतर आता गुवाहाटीतील सामनाही दमदार होईल, अशी अपेक्षा आहे. या मैदानावर खेळला गेलेला यापूर्वीच्या एकदिवसीय सामन्यात धावांचा डोंगर उभारला होता. तेव्हा रोहित-विराटने शतके झळकावली होती. यावेळी रोहित-विराटशिवाय सूर्यकुमार यादवचा फॉर्मही चाहत्यांना पाहायला आवडेल. तसे झाले तर सरकारने दिलेल्या अर्ध्या दिवसाच्या रजेचा आनंदही नक्कीच द्विगुणीत होईल.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: तयारीचा आढावा घेतला

अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यापूर्वी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी स्वतः बरसापारा स्टेडियमची पाहणी केली आणि तयारीचा आढावा घेतला. संपूर्ण व्यवस्थेबाबत त्यांनी आसाम क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्‍यांशीही चर्चा केली. याआधी, गुवाहाटी पोलिसांनी शनिवारी मॅच डेसाठी रहदारीच्या नियमांबाबत विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

वन-डे साठी ‘हाफ डे’

आसाम सरकारने 10 जानेवारीला भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामन्याच्या दिवशी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, बारसापारा स्टेडियम असलेल्या कामरूप जिल्ह्यासाठीच ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर कामरूप जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि कामाची ठिकाणे सामन्याच्या दिवशी दुपारी एक नंतर बंद राहतील.

Back to top button