राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा : दिव्याची आघाडी कायम; मेरी द्वितीय स्थानावर | पुढारी

 राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा : दिव्याची आघाडी कायम; मेरी द्वितीय स्थानावर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे सुरू असणार्‍या 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या दहाव्या फेरीनंतर गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख साडेआठ गुणांसह आघाडीवर आहे. चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डची महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स आठ गुणांसह द्वितीय स्थानावर आहे.

अग्रमानांकित महिला ग्रँडमास्टर दिल्लीची वंतिका अग्रवाल व पाचवी मानांकित अर्जुन पुरस्कार विजेती गोव्याची आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ती कुलकर्णी या दोघी साडेसात गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत. सातवी मानांकित कोल्हापूरची महिला मास्टर ऋचा पुजारी, आठवी मानांकित औरंगाबादची महिला ग्रँडमास्टर साक्षी चितलांगे, नववी मानांकित महिला मास्टर कर्नाटकची ईशा शर्मा, दहावी मानांकित पश्चिम बंगालची महिला मास्टर अर्पिता मुखर्जी, 14 वी मानांकित पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर निशा मोहता, पंधरावी मानांकित महिला ग्रँड मास्टर तामिळनाडूची व्ही. वर्षीणी, 17 वी मानांकित मुंबईची महिला फिडे मास्टर विश्वा शहा व 21 वी मानांकित केरळची महिला फिडे मास्टर निम्मी जॉर्ज या आठ जणी सात गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.

उद्या गुरुवार सकाळी साडेनऊ वाजता अंतिम अकरावी फेरी सुरु होणार आहे. अंतिम फेरी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ होईल. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे चेअरमन संजय घोडावत, ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, प्राचार्य मोहंती उपस्थित असणार आहेत.

Back to top button