टीम इंडियात प्रवेश झाला अवघड | पुढारी

टीम इंडियात प्रवेश झाला अवघड

मुंबई, वृत्तसंस्था : टीम इंडियात निवड होण्यासाठी खेळाडूंचा मार्ग आणखी खडतर बनला असून बीसीसीआयने राष्ट्रीय संघात येण्यासाठी अनेक कडक नियम बनवले आहेत. यामध्ये युवा खेळाडूंना पुरेसे देशांतर्गत सामने खेळणे बंधनकारक असून यो यो टेस्टची मानकेही पूर्ण करणे गरजेचे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आढावा बैठक रविवारी (1 जानेवारी) मुंबईत झाली. या बैठकीत खेळाडूंचा वर्कलोडसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

बैठकीनंतर बीसीसीआयने अधिकृत अपडेट दिले आहे. बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी मुंबईत टीम इंडियाची आढावा बैठक बोलावली. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, भारतीय कर्णधार रोहित शर्मा, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि पुरुष निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा उपस्थित होते.

बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, यापुढे युवा खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेसे देशांतर्गत हंगाम खेळावे लागतील. भारतात रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली यांसारख्या मोठ्या देशांतर्गत स्पर्धा आहेत. बीसीसीआयने सांगितले की, उभरत्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये निवडीसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे देशांतर्गत हंगाम खेळावे लागतील. मात्र, शेवटचा खेळाडू खेळण्यासाठी किती सामने आवश्यक असतील हे सांगण्यात आलेले नाही. त्याचबरोबर फिटनेससाठी त्या त्या स्तरावरील यो यो टेस्ट पास असणे आवश्यक आहे. खेळात कितीही चांगला परफॉर्मन्स केला आणि तो यो यो टेस्ट पार करू शकला नाही तर त्याला संघात स्थान दिले जाणार नाही, असे सांगण्यात आले. यो-यो टेस्ट व्यतिरिक्त बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला दुखापतीनंतर टीम इंडियामध्ये परतण्यासाठी डेक्सा टेस्ट अनिवार्य केली आहे.

भारतीय संघाच्या कामगिरीबाबत आढावा बैठक बरेच दिवस प्रलंबित होती. बीसीसीआयने टी-20 विश्वचषक 2022 नंतर संघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर बांगला देश दौर्‍यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. एकदिवसीय मालिकेत खालच्या क्रमांकावर असलेल्या बांगला देशकडून झालेल्या पराभवाने बीसीसीआयच्या चिंतेत भर टाकली होती. या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे, अशा परिस्थितीत बोर्डाचे लक्ष एकदिवसीय फॉरमॅटवर अधिक आहे.

Back to top button