रोनाल्डोविषयी फर्नांडो सांतोस पुन्हा आपल्या मतावर ठाम | पुढारी

रोनाल्डोविषयी फर्नांडो सांतोस पुन्हा आपल्या मतावर ठाम

दोहा, वृत्तसंस्था : पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी पुन्हा एकदा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो या विषयावर ठाम भूमिका घेतली आहे. त्याला केव्हा मैदानात उतरवायचे हे आमचे आधीच ठरले होते, असेही सांतोस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या आधी स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यातही सांतोस यांनी दीर्घ काळ रोनाल्डोला बेंचवर बसवले होते.

मोरोक्कोने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या संघाचा फिफा विश्वकरंडकात 1-0 असा पराभव करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. फर्नांडो सांतोस यांनी रोनाल्डोला सामन्याच्या सुरुवातीपासून न खेळविण्याचा निर्णय घेतल्यामुळे संघाचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे; मात्र आपण रोनाल्डोला बाकावर बसविण्यात चूक केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात स्टार खेळाडू रोनाल्डोला का खेळवले गेले नाही, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, त्याला सामन्याच्या कुठल्या क्षणी मैदानात आणायचे हे सहकार्‍यांचे आणि माझे आधीच ठरले होते. त्याला सुरुवातीपासूनच मैदानात उतरवण्यात आले असते, तरी सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे मला वाटत नाही, कारण मोरोक्कोच्या खेळाडूंनी आमच्यापेक्षा सरस खेळ केला. आमचे काही डावपेच चुकले. मोरोक्कोचा संघ चांगली कामगिरी करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button