पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन | पुढारी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

अहमदाबाद, वृत्तसंस्था : 36व्या राष्ट्रीय खेळ 2022 स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये गुरुवारी संध्याकाळी उद्घाटन करण्यात आले. ही स्पर्धा गुजरातमधील सहा शहरांमध्ये होणार आहे. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आदी उपस्थित होते. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकणारी सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, मीराबाई चानू आदी खेळाडूही या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते.

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या खेळाडूंना संबोधित केले. गुजरातमध्ये प्रथमच राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले आहे. खेळाच्या पायाभूत सुविधा जर चांगल्या असतील तर खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढतो. वल्लभभाई पटेल स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडीयम आहे. यावर होत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये मी खेळाडूंचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गुजरातमध्ये आलाच आहात तर खेळाबरोबर गरब्याचाही आनंद घ्या, असे आवाहनही त्यांनी खेळाडू, कोच अ अधिकार्‍यांना केले. या स्पर्धेसाठी मोटेरा स्टेडियम एखाद्या नववधूप्रमाणे सजवण्यात आले होते. यावेळी ओपन जीपमधून पंतप्रधान मोदी यांनी मैदानावर फेरफटका मारला.

29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत चालणार्‍या या राष्ट्रीय खेळांमध्ये सुमारे 7,000 खेळाडू 36 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. काही स्पर्धांना सुरुवात झाली आहे, तर शुक्रवारपासून अनेक क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत.

* सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान टेबल टेनिस स्पर्धेने झाली आहे.

* गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये हे खेळ होणार आहेत. मात्र, ट्रॅक सायकलिंगचा कार्यक्रम दिल्लीतील वेलोड्रोम येथे होणार आहे.

* राष्ट्रीय खेळांची शेवटची आवृत्ती 2015 मध्ये केरळमध्ये झाली होती. गोव्याला 2016 मध्ये पुढील राष्ट्रीय खेळांचे आयोजन करायचे होते, परंतु काही कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला.

* 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 7000 खेळाडू तसेच भारतीय सशस्त्र दलातील क्रीडा संघही राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. एकूण 36 क्रीडा स्पर्धा आहेत.

Back to top button