ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलपटू! | पुढारी

ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलपटू!

पुढारी ऑनलाईन डेस्क

ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या सामन्यात रिपब्लिक ऑफ आर्यलँडविरुद्ध आपल्या कारकिर्दितला ११० वा आंतरराष्ट्रीय गोल केला. त्याने इरानच्या अली दाई यांचा सर्वाधिक १०९ आंतरराष्ट्रीय गोलचा विक्रम मोडला. ख्रिस्तियानो रोनाल्डो नुकताच जुवेंटस सोडून मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये परतला आहे.

रोनाल्डोने युरो कप २०२० मध्येच अली यांच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याने बुधवारी झालेल्या आर्यलँड विरुद्धच्या सामन्यात ८९ व्या मिनिटाला हेडरद्वाने गोल करत हा विक्रम मोडला. या सामन्यात आर्यलँडने पोर्तुगालला चांगलीच कडवी टक्कर दिली.

आर्यलँडच्या जॉन एगानने १५ व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी हाफ टाईम पर्यंत कायम राखली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही बराच काळ आर्यलँडने पोर्तुगालला गोल करण्याची संधी दिली नाही. अखेर रोनाल्डोने ८९ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. पूर्णवेळ संपल्यानंतर एक्स्ट्रा टाईममधल्या सहाव्या मिनिटाला रोनाल्डोने पुन्हा एकदा गोल करत सामन्यात २- १ अशी विजयी आघाडी घेतली.

या विजयानंतर आणि विक्रम प्रस्थापित केल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणाला, ‘मी फक्त रेकॉर्ड मोडले म्हणून खूष नाही तर आमच्यासाठी हा एक खास क्षण आहे. संघाने जी कामगिरी केली त्याची प्रशंसा करतो. आम्ही आमचा विश्वास शेवटपर्यंत ढळू दिला नाही. मी खूप खूष आहे.’

वर्ल्डकप पात्रता फेरीतील ग्रुप A मध्ये पोर्तुगाल चार सामन्यात १० गुण मिळवत अव्वल स्थानावर आहे. या यादीत सर्बिया ७ गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. या ग्रुपमधील विजेता कतारमधील अंतिम फेरीसाठी पात्र होणार आहे. तर उपविजेता प्ले ऑफमध्ये खेळणार आहे.

आर्यलँडचा संघ अजूनही तळातून दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ग्रुपमध्ये तळात अझरबैजान संघ आहे. आर्यलँडने आपले तीन सामने गमावले आहेत.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : पुण्याची गोधडी थेट पोहचली विदेशात!

Back to top button