टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ७ सप्टेंबर रोजी घोषणा | पुढारी

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ७ सप्टेंबर रोजी घोषणा

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था : आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा येत्या 7 सप्टेंबर रोजी करण्यात येण्याची शक्यता आहे, असेही म्हटले जाते आहे की, 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि संयुक्‍त अरब अमिरातमध्ये सुरू होणार्‍या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध होणार्‍या चौथ्या कसोटीनंतर होऊ शकते. यामुळे आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर वर्ल्डकपसाठीचा संघ घोषित करण्यात येणार नाही, हे आता निश्‍चित झाले आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टी-20 वर्ल्डकपसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ निवडण्यात येणार आहे. संघ आपल्यासोबत तीन खेळाडूंना राखीव ठेवेल. पृथ्वी शॉ, इशान किशन व एक फिरकी गोलंदाज रिझर्व्ह म्हणून संयुक्‍त अरब अमिरातला जातील. तर सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर व मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर, आर. अश्‍विन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यापैकी दोन गोलंदाजांना संधी मिळू शकते.

भारतीय संघ 24 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेस सुरुवात करेल. टीम इंडिया आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड, 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान आणि त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी क्‍वालिफायर संघाविरुद्ध भिडेल. पहिल्या फेरीत आठ संघ ‘सुपर-12’मध्ये स्थान मिळविण्यासाठी खेळतील.

Back to top button