प्रशांत किशोर काँग्रेसवासी होण्यावर जुन्या नेत्यांनी नाके मुरडली? | पुढारी

प्रशांत किशोर काँग्रेसवासी होण्यावर जुन्या नेत्यांनी नाके मुरडली?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याला काही केल्या मुहूर्त लागत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसमधील काही जुन्या खोडांचा प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सामिल करुन घेण्यास विरोध असल्याचे कळते. त्यामुळे याबाबत काँग्रेसच्या अंतिरम अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.

सोनिया गांधी जे या बाबत विरोधी भुमिका घेत आहेत त्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. प्रशांत किशोर हे जेडीयू सोडून काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यांनी जुलै महिन्यात सोनिया गांधी, प्रियांका गांधी – वधेरा आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीत पक्षात त्यांच्या भुमिकेबद्दल सविस्तर चर्चा झाली होती.

राहुल गांधी आणि प्रियांका यांनी गेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्याबरोबर काम केले होते. त्यामुळे या दोघांची  किशोरांना पक्षात सामावून घेण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

किशोर जुळवून घेणार का?

मात्र याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतमतांतरे आहेत. काहींच्या मते प्रशांत किशोर पक्षात येणे हा चांगला पर्याय आहे. तर काहींच्या मते असा थेट पक्षात प्रवेश केल्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. गांधी परिवाराने पक्षातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे, जे गांधी परिवाराने सध्या बंद केले आहे.

किशोरांनी पक्षाच्या सार्वजनिक सभा, विरोध नेत्यांना बरोबर घेण्याचा आणि अजून काही योजनांची एक लिस्ट शेअर केली आहे. ही लिस्ट काही काँग्रेसी नेत्यांना पचणार नाही. पक्षातील किशोर विरोधी गटाशी संबंधित एका नेत्याने सांगितले की, प्रशांत किशोरांकडे अशी कोणतीही जादूची कांडी नाही. निवडणूक रणनीतीकार किशोर यांना पक्षाची संस्कृती आणि दृष्टीकोण याच्याशी जुळवून घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांच्या मृत्यूनंतर गांधी परिवार एका चांगल्या सल्लागाराच्या शोधात आहे. जो पक्षामध्ये नवी उर्जा आणू शकेल. काँग्रेसला काही राज्यांमध्ये पाठोपाठ पराभवाचा सामना करावा लागला आहे.

काय म्हणाले होते प्रशांत किशोर?

विशेष म्हणजे प्रशांत किशोरांचा काँग्रेसबरोबरचा अनुभव फारसा समाधानकारक नाही. त्यांनी यापूर्वी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांची आघाडी झाली होती. मात्र ही आघाडी साफ अपयशी ठरली होती. किशोर यांनी काँग्रेसला फक्त पंजाबमध्ये यश मिळवून दिले होते.

मे महिन्यात प्रशांत किशोरांनी काँग्रेस एक १०० वर्ष जुना पक्ष आहे. त्यांची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे असे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होती की, पक्षातील काही नेते प्रशांत किशोर किंवा दुसऱ्या कोणी सांगितलेल्या मार्गाने काम करण्यास तयार नाहीत. ते माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे काम करण्यास तयार होणार नाहीत. काँग्रेसला आता हे मान्य करावे लागेल की त्यांच्या पक्षात काही अडचणी आहेत त्याबाबत काहीतरी केले पाहिजे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : मृण्मयी देशपांडे २६/११ मध्ये साकारत आहे डॉक्टरची भुमिका

Back to top button