IND vs PAK : भारत-पाकिस्‍तान यांच्यात आज जंगी सामना; गोलंदाजांकडे असेल विजयाची किल्ली | पुढारी

IND vs PAK : भारत-पाकिस्‍तान यांच्यात आज जंगी सामना; गोलंदाजांकडे असेल विजयाची किल्ली

दुबई : विश्वचषक असो वा आशिया चषक असो, जोपर्यंत भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होत नाही, तोपर्यंत त्या स्पर्धेला खरी सुरुवात होत नाही. तेव्हा आशिया चषक जरी शनिवारी सुरू झाला असला, तरी त्याची खरी सुरुवात आज, रविवारच्या भारत-पाकिस्तान लढतीने होईल. भारत-पाकिस्तान हे जरी फक्त अनेक देशांच्या स्पर्धांत एकमेकांसमोर येत असले, तरी आज दोन्ही देशांतील खेळाडू, प्रेक्षक आणि मीडिया आता त्याला धर्मयुद्धाचे स्वरूप न देता तुल्यबळ संघांतील क्रिकेटच्या सामन्याचे स्वरूप देतात, हे क्रिकेटच्या आणि विशेषतः या दोन्ही देशांतल्या खेळाडूंच्या द़ृष्टीने चांगले आहे. अर्थात, दोन्ही संघांना या लढतीत हरणे परवडणारे नसते. ऑक्टोबर 2021 साली टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून लाजिरवाणा पराभव केल्याची आठवण घेऊन आपण या सामन्याला सामोरे जाणार आहोत.

दोन्ही संघांची मदार ही ठराविक 3 ते 4 फलंदाजांवर आहे. भारताची फलंदाजीची मदारही पूर्णपणे रोहित शर्मा, राहुल, कोहली आणि पंत यांच्या कामगिरीवर असेल, तर सहायक फलंदाज म्हणून पंड्या, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, जडेजा यांच्यापैकी जे संघात असतील त्यांच्यावर असेल. भारताने आगामी विश्वचषकाची तयारी म्हणून किंवा प्रमुख खेळाडूंना आराम द्यायच्या हेतूने असेल; पण गेल्या काही महिन्यांत अनेक खेळाडू सलामीवीर म्हणून चाचपून पाहिले.

आशिया कपमधील आपल्या संघाचा विचार करता, आज रोहित शर्माच्या जोडीला जर राहुल आला, तर ही यावर्षी न खेळवलेली जोडी आहे. 20 षटकांच्या सामन्यात फलंदाजाला स्थिरस्थावर व्हायला वेळ नसला, तरी पाकिस्तानविरुद्ध सलामीची जोडी कमीत कमी पहिला पॉवर प्ले खेळून काढणे अपेक्षित आहे. या सर्व चाचपण्यात रोहित शर्माचा त्याच्या शेवटच्या पंधरा डावांचा आढावा घेतला, तर त्याने 28.64 च्या सरासरीने 401 धावा केल्या आहेत. (IND vs PAK)

विराट कोहलीच्या गेल्या काही महिन्यांतल्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह आहे; पण त्याच्या शेवटच्या 15 डावांत त्याने तब्ब्ल 6 अर्धशतकांच्या जोडीने 51.66 च्या सरासरीने 465 धावा केल्या आहेत. आज रोहित शर्मा, सूर्यकुमार, कोहली, राहुल, पंत, पंड्या असा फलंदाजीचा क्रम बदलला, तरी तो पथ्यावर पडेल. बुमराह आणि शमीच्या अनुपस्थितीत भारताची गालंदाजी निर्विवादपणे तोकडी आहे. भुवनेश्वर कुमारला जरी हल्ली सूर पुन्हा गवसला असला, तरी दुबईच्या कोरड्या ठणठणीत हवेत आणि सपाट खेळपट्टीवर त्याला कितपत यश मिळेल, यात शंकाच आहे.

त्याच्या साथीला पंड्या असेल; पण अर्शदीप, आवेश खान, दीपक हुडा हा कमालीचा अननुभवी ताफा आहे. रवी बिष्णोई आणि अश्विन यातल्या एकाला स्थान मिळेल. दुसरीकडे, पाकिस्तानची फलंदाजी सर्वस्वी बाबर आझम, फकर झमान आणि मोहम्मद रिझवान यांच्याभोवती केंद्रित असेल. बाबर आझमचा पहिल्यांदा फलंदाजी करतानाचा 123.02 आणि दुसर्‍यांदा फलंदाजी करतानाचा 133.42 स्ट्राईक रेट आहे, तर फकर झमानचा 139.65 स्ट्राईक रेट आणि जोडीला रिझवानची फटकेबाजी पाकिस्तानची फलंदाजी मजबूत बनवते.

आज टॉपच्या तीन फलंदाजांचे संघाच्या धावसंख्येतील योगदान आणि मधल्या फळीचा स्ट्राईक रेट या दोन्हीत पाकिस्तान जगात अव्वल स्थानावर आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकापासूनची ही तुलना आहे. मान्य आहे की, या तुलनेत पाकिस्तान संघाने क्रिकेट जगतात सर्वात कमी सामने खेळले आहेत; पण याचमुळे ते यशासाठी भुकेले आहेत. पाकिस्तानच्या गोलंदाजीची धार शाहिन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम यांच्या अनुपस्थितीत कमी झाली आहे. विशेष म्हणजे, आपल्या फलंदाजांना नेहमीच त्रासदायक ठरलेले डावखुरे जलदगती गोलंदाज या पाकिस्तानी संघात नाहीत. अनुभवी हसन अलीच्या जोडीला हॅरिस रौफ, हसनैन, दहानी वगैरे मंडळी आहेत.

महान लेगस्पिनर अब्दुल कादिरचा मुलगा उस्मान कादिर वडिलांचा वारसा चालवतो का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. पाकिस्तानच्या अनेक नवीन गोलंदाजांना आपण हिरो बनवले आहे, हा इतिहास बघता त्यांची आकडेवारी बघणे गौण ठरते. दोन्ही संघांची फलंदाजी कागदावर तुल्यबळ आहे; पण पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरमध्ये सातत्य आहे, त्याचप्रमाणे मधल्या फळीचे योगदान उपयुक्त ठरण्यासारखे आहे. तेव्हा हा सामना असेल तो गोलंदाजीचा. भुवनेश्वर कुमारची वाळवंटातील कामगिरी आणि जोडीला अननुभवी साथ विरुद्ध हसन अली आणि त्याचा अननुभवी तसेच पारंपरिक पाकिस्तानी बेभरवशाचा ताफा यात जो बाजी मारेल, तो सामना जिंकेल. शाहिन आफ्रिदीच्या गैरहजेरीत 2021 ची कामगिरी भारताला पुसून टाकायची असेल; तर बाबर आझम, फकर झमान आणि मोहम्मद रिझवानला आपल्या गोलंदाजांना वेसण घालावीच लागेल.

स्टेडियमची लांबी-रुंदी किती आहे? (IND vs PAK)

दुबईचे स्टेडियम हे आबुधाबीसारखे मोठे नाही. दुबईची समोरची बाऊंड्री लहान आहे. त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. समोरची बाऊंड्री ही 65 मीटर लांब आहे. तर स्क्वेअरची बाऊंड्री ही तुलनेने मोठी आहे. ऑफ साईडची स्क्वेअर बाऊंड्री ही 82 मीटर, तर लेगची स्क्वेअर बाऊंड्री ही 80 मीटर आहे. त्यामुळे व्ही शेपमध्ये खेळणार्‍या फलंदाजांना समोरच्या छोट्या बाऊंड्रीचा चांगला फायदा उचलता येईल.

सामन्यावेळी हवामानाचा अंदाज काय राहील?

भारत-पाकिस्तान सामन्यावेळी तापमान थोडे उष्णच राहील. तापमान जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सिअस असेल. या भागात 28 ऑगस्ट रोजी पाऊस पडणार असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. संध्याकाळी आर्द्रतादेखील कमी असेल.

कशी आहे दुबईची खेळपट्टी?

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी सहसा पाटा खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. मात्र, दोन ते तीन सलग सामने झाल्यानंतर खेळपट्टीवर अतिरिक्त उसळी आणि चेंडू जास्त सीम होण्यास सुरुवात होते. मात्र, पहिले काही सामने हे जास्त धावसंख्येचे होतील, असा अंदाज आहे. गोलंदाजांच्या द़ृष्टिकोनातून पाहावयाचे झाले, तर 180 आणि 190 धावांचे टार्गेटदेखील या स्टेडियमवर सेफ टार्गेट नाही. दुबईत नाणेफेकीला जास्त महत्त्व आहे. जो टॉस जिंकेल, तो सामना जिंकेल, असे गेल्या काही सामन्यांवरून दिसते.

कोहलीचा शंभरावा सामना

विराट कोहली या सामन्यात मैदानात उतरताच एक विशेष स्थान मिळवणार आहे. विराट कोहलीचा हा टी-20 क्रिकेटमधला 100 वा सामना आहे. कोहली यासोबतच असा पराक्रम करणार आहे जो आतापर्यंत कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने केला नाही. विराट कोहली या सामन्यासह प्रत्येक फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू असेल. विराट कोहलीने आतापर्यंत 99 टी-20 सामन्यांव्यतिरिक्त 102 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Back to top button