CWG : बीडच्या अविनाशचा राष्ट्रकुल स्पर्धेत डंका, स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक | पुढारी

CWG : बीडच्या अविनाशचा राष्ट्रकुल स्पर्धेत डंका, स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक

बर्मिंगहॅम ; वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील बीड येथील रहिवाशी असलेले अविनाश साबळे याने राष्ट्रकुल (CWG 2022) स्पर्धेत इतिहास रचला आहे. साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले आहे. अविनाशने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. शनिवारी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत साबळेने 8.11.20 वाजता दुसरे स्थान पटकावले. सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा अविनाश फक्त 0.5 सेकंद मागे होता. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. महाराष्ट्राचा अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा रहिवाशी आहे.

अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत कडवी टक्कर दिली. केनियाचे तीन खेळाडू आघाडीवर असतानाही अविनाश त्यांना तोडीस तोड उत्तर देत होता. चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले होते. अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि रौप्यपदकाच्या शर्यतीत झेप घेतली. त्याची ही धाव पाहून स्टेडियमवर भारताचा जयघोष होऊ लागला. (CWG 2022)

केनियाच्या खेळाडूंचीही धाकधूक वाढली होती आणि अविनाशने टफ फाईट दिली. अविनाशने रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. अविनाशने 8.11.20 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.

सुवर्णपदक विजेता अब्राहम किबिव्होटपेक्षा अविनाश फक्त 0.5 सेकंद मागे होता. केनिया अब्राहमने 8.11.15 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. त्याचवेळी केनियाच्या आमोस सेरेमने 8.16.83 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले.

Back to top button