बजरंग पुनियाची ‘गोल्डन’ हॅट्ट्रिक | पुढारी

बजरंग पुनियाची ‘गोल्डन’ हॅट्ट्रिक

बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने कॅनडाच्या 21 वर्षीय लॅचलीन मॅक्नेलचा 9-2 असा पराभव केला. बजरंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे गोल्डमेडल आहे. त्याने 2018 मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतदेखील 65 किलो वजनी गटात ‘सुवर्ण’ कमाई केली होती. तर 2014 मध्ये ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत 61 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली होती.

65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियाने पहिल्या फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने पहिल्याच सत्रात 4 गुण मिळवत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर मॅक्नेलने दुसर्‍या डावात दोन गुण मिळवले. त्यानंतर बजरंग पुनियाने मॅक्नेलला रिंगच्या बाहेर ढकलत दोन गुण मिळवत पुन्हा आघाडी घेत 4 गुण मिळवले. बजरंग पुनियाने मॅक्लेनच्या पायावर सातत्याने आक्रमण केले. त्याने पुन्हा त्याला रिंगच्या बाहेर ढकलत एक गुण मिळवला. सामना संपता संपता बजरंगने दोन गुण मिळवत सामना 9-2 असा एकतर्फी जिंकला.

Back to top button