महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त | पुढारी

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील कुस्तीवर नियंत्रण असणारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. या परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार असून राज्याच्या दृष्टीने मल्लांसाठी हा मोठा धक्का आहे.

भारतीय कुस्ती महासंघाने 30 जून रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेतला. येत्या काही दिवसांत राज्य कुस्तीगीर परिषदेवर हंगामी समितीची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत जिल्हा संघटना आणि अनेक मल्लांकडून तक्रारी येत होत्या. तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तावांना त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आता तेथे हंगामी समितीची नियुक्ती करण्यात येईल.

राज्य कुस्तीगीर परिषदेस आतापर्यंत 23 आणि 15 वर्षांखालील दोन राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचे निर्देश दिले होतो. मात्र त्यांनी यापैकी एकही स्पर्धा आयोजित करण्यात स्वारस्य दाखवले नाही. संलग्नता रद्द करण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. देशात हरियाणानंतर कुस्तीमध्ये महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. पण तेथेच संघटना काहीच काम करत नसेल तर कसे चालेल. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेले आरोपही गंभीर होते. त्यामुळे आम्ही ही कडक कारवाई केली असल्याचे महासंघाच्या सचिवांनी सांगितले.

याच संदर्भात जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने पै. संदीप अप्पा भोंडवे यांनी उपोषण देखील केले होते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासंदर्भात राज्य कुस्ती परिषदेचे सर्वेसर्वा बाळासाहेब लांडगे आणि त्यांचा मुलगा ललित लांडगे यानी खासगी कंपनीशी करार केला.

मात्र, तो करार त्यांनी इतर सदस्यांपासून लपवून ठेवला आणि त्यानंतर शासकीय अनुदानही मिळविले, असा त्यांच्यावरील मुख्य आरोप होता. महाराष्ट्र शासनाने देखील काही दिवसांपूर्वी त्यांना हिशोब दाखवण्यासंदर्भात सूचना देखील काढली होती. दरम्यान, याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे आणि कार्यालयीन प्रमुख ललित लांडगे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Back to top button