केशव महाराज द. आफ्रिकेचा कर्णधार | पुढारी

केशव महाराज द. आफ्रिकेचा कर्णधार

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांचा कर्णधार टेम्बा बवुमा दुखापतीमुळे इंग्लंडच्या आगामी दौर्‍यातून बाहेर पडल्यामुळे केशव महाराज वन-डे आणि डेव्हिड मिलर टी-20 संघाचे नेतृत्व करतील. डीन एल्गर दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे; मात्र बवुमा कसोटी संघाच्या आघाडीच्या फळीचा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. त्यामुळे बवुमा संपूर्ण दौर्‍यातून बाहेर पडणे ही संघासाठी मोठी धक्‍कादायक बाब आहे.

बवुमा इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांच्या मालिकेशिवाय तीन कसोटी सामान्यांनाही मुकणार आहे. याशिवाय तो आयर्लंडविरुद्धचे दोन टी-20 सामनेदेखील खेळू शकणार नाही. बवुमाला जूनमध्ये भारत दौर्‍यात झालेल्या टी-20 मालिकेत दुखापत झाली होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या माहितीनुसार, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आठ आठवड्यांचा कालावधी लागेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड दौर्‍यासाठी 32 वर्षीय फलंदाज रिले रोसोयूला टी-20 संघात परत आणले आहे. 2016 मध्ये रोसोयू दक्षिण आफ्रिकेकडून अखेरचा खेळला होता आणि त्यानंतर तो इंग्लंडच्या काऊंटी संघ हॅम्पशायरमध्ये सामील झाला.

याशिवाय वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली असली, तरी टी-20 आणि कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झे हा टी-20 संघातील नवा चेहरा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौर्‍याची सुरुवात 19 जुलैपासून होणार असून, पहिला एकदिवसीय सामना डरहम येथे खेळवला जाईल. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कसोटी मालिका होणार आहे. लॉर्डस्, ओल्ड ट्रॅफर्ड आणि ओव्हल येथे कसोटी सामने खेळवले जातील. याशिवाय बवुमाला वगळता यावर्षी एप्रिलमध्ये बांगला देशविरुद्ध झालेल्या डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील संघात कोणतेही बदल झाले नाहीत.

Back to top button