टेनिस : स्नेहल-मिहिकाला सुवर्ण | पुढारी | पुढारी

टेनिस : स्नेहल-मिहिकाला सुवर्ण | पुढारी

गुवाहाटी : वृत्तसंस्था

खेलो इंडिया यूथ गेम्सच्या तिसर्‍या पर्वाच्या अखेरच्या दिवशी बुधवारीदेखील महाराष्ट्राची पदकांची कमाई कायम राहिली. टेनिसमध्ये स्नेहल माने-मिहिका यादव यांनी 21 वर्षांखालील गटात दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली.

अंतिम फेरीत त्यांनी तेलंगणाच्या समा सत्विका-श्राव्या चिलाक्लापुडी यांचा 6-3, 10-7 असा पराभव केला. याच वयोगटात मुलांच्या विभागात दक्ष अग्रवाल-यशराज दळवी यांना रौप्य तर अंशुल सातव-साहेब सोधी या जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या 17 वर्षांखालील गटात एकेरीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरे हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या 21 वर्षांखालील गटातही महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तामिळनाडूच्या सुरेश दक्षिणेश्‍वर याने महाराष्ट्राच्या ध्रुव सुनिशचा 6-3, 6-2 असा पराभव केला.

जलतरणात करिनाची ‘सोनेरी’ कामगिरी

महाराष्ट्राच्या करिना शांता हिने मुलींच्या 17 वर्षांखालील गटात 200 मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक शर्यत जिंकून स्पर्धेतील अखेरच्या दिवसाची ‘सोनेरी’ सांगता केली. महाराष्ट्राच्या वेदांत बापना व अ‍ॅरोन फर्नांडिस यांनी रौप्यपदकाची कमाई केली.   महाराष्ट्राच्याच अनुष्का पाटील (2 मिनिटे 44.13 सेकंद) व झारा जब्बार (2 मिनिटे 47.78 सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावित वर्चस्व गाजविले. मुलांच्या 17 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या वेदांत बापना याने 50 मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक मिळविले.  21 वर्षांखालील गटात अ‍ॅरोन फर्नांडिसने 100 मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत रौप्यपदकावर नाव कोरले. 

बॉक्सिंग : भावेशला रौप्यपदक

21 वर्षांखालील गटात भावेश कट्टिमणी रौप्यपदकाचा मानकरी ठरला. 52 किलो वजन प्रकारात भावेशला दिल्लीच्या रोहित मोरकडून पराभव पत्करावा लागला.

वेटलिफ्टिंग : स्नेहलला सुवर्ण

महाराष्ट्रातील कुरुंदवाडच्या स्नेहल भोंगाळे हिने कनिष्ठ मुलींच्या 87 किलोवरील गटात सुवर्णपदकाचा मान मिळविला. तिने स्नॅचमध्ये 65 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 93 किलो असे एकूण 158 किलो वजन उचलले. ती कुरुंदवाड येथील हर्क्युलस अ‍ॅकॅडमीत सराव करते. महाराष्ट्राच्याच प्रीती देशमुख हिने युवा विभागाच्या 81 किलो गटात रौप्यपदक पटकाविले. तिने स्नॅचमध्ये 69 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 82 किलो असे एकूण 151 किलो वजन उचलले.

Back to top button