भारताचा सनसनाटी विजय; सुपर ओव्हरमध्ये सलग दोन षटकार ठोकून रोहितने विजय खेचला! | पुढारी

भारताचा सनसनाटी विजय; सुपर ओव्हरमध्ये सलग दोन षटकार ठोकून रोहितने विजय खेचला!

हॅमिल्टन : पुढारी ऑनलाईन 

भारताने न्यूझीलंड विरुद्धचा सुपर ओव्हर पर्यंत गेलेला रोमहर्षक सामना जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली. याबरोबर भारताने न्यूझीलंडमध्ये पहिली टी -20 मालिका जिंकण्याचा इतिहासही रचला. भारताच्या या विजयाचे सुपर ओव्हरच्या अखेरच्या दोन चेंडूवर दोन षटकार मारणारा रोहित शर्मा आणि सामन्याच्या अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर 1 धाव हवी असताना रॉस टेलरचा त्रिफळा उडवणारा मोहम्मद शमी हे दोघे हिरो ठरले. 

भारताचे 180 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडनेही धडाकेबाज सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि मार्टीन गुप्टीलने 6 व्या षटकात 47 धावांची सलामी दिली. पण, शार्दुल ठाकूरने 21 चेंडूत 31 धावा करणाऱ्या धोकादायक गुप्टीलला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर लगेचच रविंद्र जडेजाने कॉलिन मुनरोला 14 धावांवर बाद करत किवींना दुसरा धक्का दिला. 

पाठोपाठ दोन धक्के बसल्यानंतर किवींची धावगती मंदावली. कर्णधार केन विल्यम्सन आणि मिशेन सँटनरने सावध फलंदाजी करत भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला खरा पण, यझुवेंद्र चहलने सँटनरचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. दरम्यान, सेट झालेल्या विल्यम्सनने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने 28 चेंडूत अर्धशतक झळकावत न्यूझीलंडला 15 व्या षटकात 128 धावांपर्यंत पोहचवले.  

विल्यम्सनच्या दमदार अर्धशतकामुळे न्यूझालंडला अखेरच्या 30 चेंडूत विजयासाठी 52 धावांची गरज होती. त्याचवेळी 16 वे षटक टाकणाऱ्या शार्दुल ठाकूरने किवींना ग्रँडहोमीच्या (5) रुपात चौथा धक्का दिला. पण, दुसऱ्या बाजूने विल्यम्सनने धडाकेबाज फलंदाजी सुरु केली. त्याने 17 वे षटकत टाकणाऱ्या बुमराहला एकाच षटकात तीन चौकार मारत 14 धावा केल्या. आता न्यूझीलंडला विजयासाठी 18 चेंडूत 29 धावांची गरज होती. 18 षटक टाकणाऱ्या चहलने चांगली गोलंदाजी करत फक्त 9 धावा दिल्या. त्यामुळे टार्गेट 12 चेंडूत 20 धावा असे आले. 

शेवटून दुसरे षटक टाकणाऱ्या बुमराहने षटकात 2 चौकारांसह 11 धावा दिल्याने आता न्यूझीलंडला विजयासाठी अखेरच्या षटकात 9 धावांची गरज होती.  पण, अखेरच्या षटक टाकणाऱ्या मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर टेलरने षटकात मारत सामना जवळ आणला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव देत शमीने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विल्यम्सनला 95 धावांवर बाद करत भारताला मोठा दिलासा दिला. विल्यम्सनने 45 चेंडूत 6 षटकार, 8 चौकार मारत 95 धावा ठोकल्या. त्यानंतर चौथा चेंडू निर्धाव टाकत शमीने किवींवर दबाव आणला. आता अखेरच्या 2 चेंडूवर 2 धावांची गरज असताना साऊदीने चोरटी धाव घेतली. 

अखेरच्या चेंडूवर 1 धावांची गरज असताना शमीने टेलरचा त्रिफळा उडवत सामना टाय केला. 

आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरवर अवलंबून होता. विराटने सुपर ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार विराटने चेंडू जसप्रीत बुमराहकडे सोपवला. पण, त्याला 1 षटकार आणि 2 चौकार मारत 17 धावा केल्या. सुपर ओव्हरचे हे 18 धावांचे टार्गेट घेवून भारताकडून सलामी जोडी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल मैदानावर आले. न्यूझीलंडकडून टीम सौउदी गोलंदाजी करण्यासाठी उतरला. पहिल्या चेंडूवर रोहितने 2 धावा घेतल्या. त्यानंतर साउदीने दुसऱ्या चेंडून फक्त 1 धाव दिली. तिसऱ्या चेंडूवर राहुलने चौकार मारला त्यामुळे भारताच्या 3 चेंडूत 7 धावा झाल्या. आता 3 चेंडूत भारताला 11  धावांची गरज होती. पण, राहुलला 1 धावच घेण्यात यश आले. भारताला 2 चेंडूत 10 धावांची गरज असताना रोहितने षटकार मारत भारताच्या आशा जाग्या ठेवल्या. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर रोहितने षटकार मारत भारताला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला. 

तत्पूर्वी, तिसऱ्या टी – 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला धडाकेबाज सुरुवात करुनही 178 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने 40 चेंडूत तडाखेबाज 65 धावा केल्या. पण, तो बाद झाल्यानंतर आलेल्या फलंदाजांना धावगती कायम राखण्यात अपयश आले. मधल्या फळीतील फलंदाज पाठोपाठ बाद होत गेले. त्यानंतर विराटची 38 धावांची खेळी आणि जडेजा, मनिष पांडेने अखेरच्या षटकात 18 धावा केल्याने भारत 179 पर्यंत पोहचला.  

न्यूझीलंडने तिसऱ्या टी – 20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. भारतानेही फलंदाजीला पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन सामन्यात शांत असलेल्या रोहित शर्माने मालिका विजयाच्या दृष्टीने महत्वाच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या आतशी खेळीमुळे भारताने पहिला 6 षटकात 69 धावा केल्या. 

दुसऱ्या बाजूने थोडा सावकाश खेळत असलेला लोकेश राहुलनेही विशी पार केली होती. पण, ग्रँडहोमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात मुनरोकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने 19 चेंडूत 27 धावा केल्या. राहुलनंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजी करण्यास येईल असे वाट होते पण, त्याने शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. यामागे त्याचा वेगाने धावगती वाढवण्याचा मानस असावा. पण, आक्रमक खेळणारा रोहित 40 चेंडूत 65 धावा करुन बाद झाल्याने विराटला मैदानावर यावेच लागले. रोहित पाठोपाठ शिवम दुबेही 3 धावा करुन माघारी परतल्याने आता भारताची मदार कर्णधार विराट आणि श्रेयस अय्यरवर आली. 

पण, पाठोपाठ विकेट पडल्याने भारताची धावगती मंदावली. 11 व्या षटकात शतकाच्या जवळ असणारा भारत 15 व्या षटकात 127 धावांपर्यंतच पोहचला होता. अखेरची 5 षटका राहिली असताना विराट आणि श्रेयस अय्यरने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला पण, श्रेयस 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने मनिष पांडेच्या साथीने 18 व्या भारताचे दिडशतक धावफलकावर लावले.  

अखेरची दोन षटके राहिली असताना बेनेटने सेट झालेल्या विराटला 38 धावांवर बाद केले त्यामुळे भारताच्या फटकेबाजीला वेसन घातले गेले. पण, अखेरच्या षटकात पांडे आणि जडेजाने 18 धावा चोपल्याने भारत 179 धावांपर्यंत पोहचला. मैदानाचा इतिहास पाहता भारताने 200 धावांच्या वरचे आव्हान देणे अपेक्षित होते. न्यूझीलंडकडून हॅमिश बॅनेटने दमदार गोलंदाजी करत 3 विकेट घेतल्या. त्याला सँटनर आणि ग्रँडहोमीने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. 

 

Back to top button