अखेर कोहली आणि शास्त्री गुरुजींचा जीव भांड्यात पडला! | पुढारी

अखेर कोहली आणि शास्त्री गुरुजींचा जीव भांड्यात पडला!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने अखेर सुटकेचा निश्वास सोडला. याचबरोबर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही दिलासा मिळाला असेल. इशांत शर्माने ट्विट करुन आपण न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी फिट असल्याचे सांगितले. २१ फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे.

भारतीय कसोटी संघातील वेगवान गोलंदाज इशांत शर्माला रणजी सामन्यावेळी दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्या न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या दुखापतीमुळे तो सराव सामन्यासही मुकला. अखेर आज त्याने आपण फिट असल्याचे ट्विट करत संघ व्यवस्थापनाला दिलासा दिला. त्याने ‘२० जानेवारीला ज्यावेळी माझ्या घोट्याला दुखापत झाली त्यावेळी दोलायमान स्थिती होती. पण, आशिष कौशिक यांच्या मदतीमुळे या दुखापतीतून सावरलो आहे. स्कॅनचे रिपोर्ट भीतीदायक होते. पण, आज मी खूष आहे कारण मी फिट आहे.’ असे कौशिक आणि त्याचा एनसीएमधील फोटो शेअर करत ट्विट केले.  

याचबरोबर सुत्रांनीही इशांतने फिटेनेस टेस्ट पास झाल्याचा निर्वाळा दिला. त्यांनी ‘हो त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. आता तो संघासोबत लवकरच न्यूझीलंडमध्ये असेल.’ अशी प्रतिक्रिया दिली. इशांतला विदर्भविरुद्धच्या रणजी सामन्यावेळी घोट्याला दुखापत झाली होती. त्याची दुखापत लेवल ३ ची असल्याने चिंता करण्यासारखी परिस्थिती होती. 

Back to top button