अखेर ठरलं!, ‘एमआय vs सीएसके’च्या सामन्याने आयपीएलचा नारळ फुटणार | पुढारी

अखेर ठरलं!, 'एमआय vs सीएसके'च्या सामन्याने आयपीएलचा नारळ फुटणार

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आयपीएल २०२० चा उद्घाटन सामना कुठल्या दोन संघात होणार याबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर संपुष्टात आला आहे. आयपीएल २०२० चा नारळ फोडण्याचा मान अखेर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना मिळाला आहे. २९ मार्चला वानखेडे स्टेडियमवर रात्री ८ वाजता या दोन संघामधील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे. आयोजकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. 

येत्या मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये किती डबलहेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने असावेत याबाबत मतमतांतरे होती. यापूर्वीच्या आयपीएलमध्ये शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दोन-दोन सामने खेळवले जायचे. पण, आयोजकांनी यंदाच्या आयपीएलमध्ये शिनवारी एकच सामना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम ५ ऐवजी ६ आठवड्यांचा होणार आहे. 

याचबरोबर यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात दोन सामन्यांनी होणार होती. पण, आयोजकांनी हा निर्णय बदलत उद्घाटनाला फक्त एकच सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. आता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडेवर उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. 

यापूर्वीच्या हंगामात दिवसात दोन सामने असतील तर त्यातील पहिला सामना दुपारी ४ तर दुसरा सामना रात्री ८ वाजता सुरू होत होता. यंदाच्या हंगामात रात्रीच्या ८ वाजताच्या सामन्याची वेळ बदलावी याबाबत चर्चा सुरू होती. आयपीएलच्या वेबसाईटवर यंदाच्या हंगामातील सामने किती वाजता सुरू होणार याची माहिती दिलेली नाही. फक्त दुपारी आणि संध्याकाळी असे नमुद केले आहे. त्यामुळे सामना सुरू होण्याच्या नेमक्या वेळेबाबत अजून कोणताही निर्णय झालेला दिसत नाही. 

Back to top button