हरियाणाला राष्ट्रीय विजेतेपद | पुढारी | पुढारी

हरियाणाला राष्ट्रीय विजेतेपद | पुढारी

रोहटक : वृत्तसंस्था 

हरियाणातील रोहटक येथे झालेल्या 46 व्या कुमार/कुमारी गट (ज्युनिअर) राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये यजमान हरियाणा संघाने अजिंक्यपद मिळवले. मुलींमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) संघाला विजेतेपद मिळाले. महाराष्ट्राच्या संघांना सेमीफायनलही गाठता आलेली नाही.

मुलांच्या अंतिम सामन्यात हरियाणाने ‘साई’चा प्रतिकार 28-19 असा मोडून काढत गतवर्षाची पुनरावृत्ती केली. मध्यांतराला 11-13 अशा 2 गुणांनी पिछाडीवर पडलेल्या हरियाणाने उत्तरार्धात जोरदार कमबॅक करीत विजयश्री खेचून आणली. ‘साई’ला उत्तरार्धात आपला प्रभाव पाडता आला नाही. 

संबंधित बातम्या

मुलींच्या अंतिम सामन्यात मात्र साईने चुरशीच्या लढतीत उत्तर प्रदेशचे कडवे आव्हान 36-32 असे मोडून काढत विजय मिळविला. विश्रांतीला 11-20 अशा 9 गुणांनी पिछाडीवर पडलेल्या साईने विश्रांतीनंतर जोरदार आक्रमण करीत या विजयाला गवसणी घातली. 

महाराष्ट्राने मात्र या स्पर्धेत निराशा केली. मुलांच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत ‘साई’कडून हार पत्करावी लागली. या सामन्यात ‘साई’ने महाराष्ट्रावर 37-31 असा विजय मिळवला. मुलींमध्ये ‘साई’ने महाराष्ट्राला 34-19 असे नमवित आगेकूच केली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही.

 

Back to top button