दोन-चार सामन्यांवरून बुमराहचे मूल्यमापन नको : मोहम्मद शमी | पुढारी

दोन-चार सामन्यांवरून बुमराहचे मूल्यमापन नको : मोहम्मद शमी

हॅमिल्टन : वृत्तसंस्था

जसप्रीत बुमराह हा वर्ल्ड क्‍लास गोलंदाज आहे. केवळ दोन-चार सामन्यांतील कामगिरीवरून त्याचे मूल्यमापन करणे चुकीचे ठरेल, अशा शब्दात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आपल्या सहकार्‍याची पाठराखण केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत बुमराहला विकेट मिळवता आली नव्हती. त्याबद्दल त्याच्यावर टीका करण्यात येत होती. त्या पार्श्‍वभूमीवर शमी बोलत होता.

न्यूझीलंड इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्याच्या दुसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शमी म्हणाला, ‘बुमराहने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. काही सामन्यांत तर फक्‍त बुमराहमुळे हरता-हरता जिंकलो आहे. त्याच्यावर टीका करायची झाल्यास त्याच्या कारकिर्दीतील आकडेवारी समोर ठेवावी. फक्‍त दोन-चार सामन्यांतील कामगिरीवरून त्याच्यावर ठपका ठेवणे योग्य नाही. तो कोणत्याही परिस्थितीतील मॅचविनर खेळाडू असून भारतीय संघातील त्याचे स्थान अमूल्य आहे.’ 

संबंधित बातम्या

दुखापतीनंतर पुनरागमन करताना कोणत्याही खेळाडूला पूर्वीसारखी लय गवसण्यास वेळ लागतो. बाहेर बसून कॉमेंट करणे सोपे असते, पण त्यामुळे खेळाडूच्या आत्मविश्‍वासाला धक्‍का बसतो याचा विचार लोक करीत नाहीत. असे करण्यापेक्षा सकारात्मक बोलून त्या खेळाडूला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे शमी म्हणाला.

Back to top button