भारतीय गोलंदाज चमकले | पुढारी | पुढारी

भारतीय गोलंदाज चमकले | पुढारी

हॅमिल्टन : वृत्तसंस्था 

न्यूझीलंड इलेव्हन विरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात दुसर्‍या दिवशी भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी किवींचा संपूर्ण संघ 235 धावांत माघारी धाडला. भारताने पहिल्या डावात 28 धावांची आघाडी घेतली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताचे प्रमुख अस्त्र असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह निरस्र झाला होता. पण, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी त्याला सूर गवसला असून त्याने आपली सरासरी सुधारत विकेटचा दुष्काळही संपवला आहे. दरम्यान, दुसर्‍या डावात भारतीय फलंदाजांनी बिनबाद 59 अशी आश्‍वासक सुरुवात केली असून पृथ्वी शॉ 35 तर मयंक अग्रवाल 23 धावांवर खेळत आहेत. 

सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या भारताने पहिल्या दिवशी 9 बाद 263 धावा केल्या होत्या. शतक ठोकल्यानंतर निवृत्त झालेला हनुमा विहारी पुन्हा फलंदाजीला आला नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी न्यूझीलंडने आपला पहिला डाव सुरू केला. पण, भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक मार्‍याचा मुकाबला करणे अवघड गेले. एकदिवसीय सामन्यात एकही बळी न मिळवू शकलेल्या जसप्रीत बुमराहने भारताला तिसर्‍या षटकात पहिले यश मिळवून दिले. या विकेटबरोबरच बुमराहने एकदिवसीय मालिकेतील आपला विकेटचा दुष्काळ संपवला. त्याने 11 षटकांत 18 धावा देत 2 विकेट घेतल्या. त्याने सरासरीही (1.64) उत्तम राखली आहे. एकदिवसीय मालिकेत त्याला विकेट घेण्याबरोबरच धावा रोखण्यातही अपयश आले होते. 

संबंधित बातम्या

बुमराह बरोबरच मोहम्मद शमीने 3, नवदीप सैनी आणि उमेश यादवने प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. तर  आर. अश्‍विनने 1 विकेट घेतली. न्यूझीलंडकडून हेन्‍री कूपरने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर सलामीवीर रचीन रवींद्र 67 चेंडूंत 34 धावांची खेळी करून बाद झाला. कर्णधार डॅरेल मिशेलनेही 32 धावांची खेळी केली. भारताकडे आता 28 धावांची आघाडी आहे. 

संक्षिप्‍त धावफलक

  भारत : प. डाव : 9 बाद 263 धावा

  न्यूझीलंड प. डाव : सर्वबाद 235 धावा. (हेन्‍री कूपर 40, रचिन रवींद्र 34. मोहम्मद शमी 3/17, जसप्रीत बुमराह 2/18.)

  भारत : दु. डाव : बिनबाद 59. (पृथ्वी शॉ 35, मयंक अग्रवाल 23 धावा)

Back to top button