टी-२० रँकिंगमध्ये विराट, रोहितला धक्का | पुढारी

टी-२० रँकिंगमध्ये विराट, रोहितला धक्का

दुबई : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा रविवारी समारोप झाला. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी आयसीसीची टी-२० रँकिंग जाहीर केली. यातील फलंदाजीच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. तर, इंग्लंड संघाचा कर्णधार इयन मॉर्गनने पहिल्या दहामध्ये उडी मारली आहे. 

आयसीसी टी-२० च्या फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम पहिल्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल दुसर्‍या क्रमांकावर आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत वादळी फलंदाजी करणारा इंग्लिश कर्णधार इयन मॉर्गनने टीम इंडियाचा कर्णधार विराटचे ९ वे स्थान पटकावले आहे. विराटची १० व्या स्थानावर घसरण झाली आहे. तर सलामीवीर रोहित शर्मालाही टॉप टेन फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडवे लागले आहे. 

संबंधित बातम्या

आयसीसी टी-२० क्रमवारीत केएल राहुल अव्वल भारतीय फलंदाज

केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २२४ धावा केल्या. तो दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावरील बाबर आजम आणि भारताचा के. एल. राहुल यांच्यात गुणांचा मोठा फरक आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावणा-या इयन मॉर्गनने ३ सामन्यांत १३६ धावा फटकावल्या. या कामगिरीसह त्याने आयसीसी टी-२० क्रमवारीत विराट आणि रोहितला मागे टाकले. त्याने ११ व्या स्थानावरून ९ व्या स्थानी झेप घेतली. 

दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार क्विंटन डिकॉकने आयसीसी टी-२० क्रमवारीत आश्वासक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने ३१, ६५ आणि ३५ धावांची खेळी साकारली. याच्या जोरावर डिकॉकने २६ व्या स्थानावरून १६ व्या स्थानी झेप घेतली आहे. 

आयसीसी टी-२० च्या गोलंदाजी क्रमवारीत आफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. तर, अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी याने अष्टपैलू खेळाडूंच्या आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. 

Back to top button