टी-20 मध्ये पोलार्ड ठरला ‘लॉर्ड’ | पुढारी

टी-20 मध्ये पोलार्ड ठरला ‘लॉर्ड’

एकेकाळी क्रिकेट जगतात दबदबा असणारा वेस्ट इंडिजचा संघ भलेही कसोटी क्रिकेट अथवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये तसा लौकिक राखू शकण्यात कमी पडत असेल. परंतु, जेव्हा आपण क्रिकेटमधील टी-20 या प्रारुपाचा विचार करतो तेव्हा यामध्ये वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ‘एक से बढकर एक’ विक्रम रचत असल्याचे दिसते. वेस्ट इंडिजचा कर्णधार केरॉन पोलार्डने नुकतेच म्हणजे 4 मार्च 2020 ला श्रीलंका संघाविरुद्ध पल्लेकल येथे खेळण्यात आलेल्या पहिल्याच टी-20 सामन्यात दोन-दोन विक्रम आपल्या नावे नोंदविले. याबरोबरच 500 टी-20 सामने खेळणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे. एवढेच नव्हे तर त्याने 10 हजार धावांचा ‘मनसबदार’ बनण्याची किमयाही साधली आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलनंतर 10 हजार धावा पूर्ण करणारा वेस्ट इंडिजचा तो दुसरा क्रिकेटपटू बनला आहे. पोलार्डने श्रीलंका संघाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात 15 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने 10 हजार धावाही पूर्ण केल्या. या प्रारुपामध्ये पोलार्डने तब्बल 279 गडीही बाद केले आहेत. 

 ब्रिजटाऊन येथे केले पदार्पण

असा जागतिक विक्रम करणारा केरॉन अ‍ॅड्रियन पोलार्डचा जन्म 12 मे 1987 रोजी त्रिनिदाद येथील टाकारिक्‍वा येथे झाला. सध्या 33 वर्षांच्या असलेल्या पोलार्डने वेस्ट इंडिजच्या संघात भरवशाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावले आहे. उजव्या हाताने फलंदाजी करताना तो अतिशय आक्रमक खेळी करणारा म्हणून परिचित आहे. त्याचपमाणे मध्यमगती गोलंदाज म्हणूनही त्याची ओळख आहे. 20 जून 2009 रोजी ब्रिजटाऊनमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांत खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने पदार्पण केले होते. 

संबंधित बातम्या

 फलंदाजीत वेस्ट इंडिजचा हुकमी एक्‍का

फलंदाजी करताना त्याने तब्बल 500 सामने खेळले. त्यापैकी 450 डावांत त्याला फलंदाजीची संधी मिळाली. तब्बल 126 वेळा नाबाद राहत त्याने 10 हजार धावांचा ‘माईल स्टोन’ पार केला आहे. त्याने फटकावलेल्या सर्वाधिक धावा 104 आहेत. त्याची सरासरी 30.86 आहे. तर स्ट्राईक रेट 150.57 आहे. या कारकिर्दीत त्याच्या नावावर एकमेव शतक तर 49 अर्धशतके आहेत. त्याने तब्बल 647 चौकार तर 652 षटकार खेचले आहेत. क्षेत्ररक्षण करत असताना त्याने 288 झेलही टिपले आहेत. 

 गोलंदाजीतही शानदार कामगिरी

गोलंदाजीतही एक वेगळीच छाप टाकत त्याने 500 सामन्यांत हजेरी लावली. त्यापैकी 322 डावांमध्ये त्याने 4 हजार 974 चेंडू टाकत 6 हजार 798 धावा देत 279 गडी तंबूत धाडले. त्याने सर्वोत्तम गोलंदाजी करीत 15 धावांमध्ये 4 गडी बाद करण्याची कामगिरी नोंदवली आहे. त्याच्या गोलंदाजीची सरासरी 24.36 असून, स्ट्राईक रेट 17.8 असा आहे. डावात चार गडी बाद करण्याची कामगिरी त्याने तब्बल 6 वेळा नोंदवली आहे. 

 वेस्ट इंडिजच्या त्रिकुटाचा बोलबाला

जर आपण सर्वाधिक टी-20 सामने खेळणार्‍या आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर नजर टाकली तर अशा खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या तीनमध्ये वेस्ट इंडिजच्याच खेळाडूंचा बोलबाला आहे. द्वितीय स्थानावर ड्वेन ब्राव्हो विराजमान आहे. त्याने 453 सामने खेळले आहेत. तर, ख्रिस गेल त्यानंतर आहे. त्याने आतापर्यंत एकूण 404 टी-20 सामने खेळले आहेत.

– किशोर कटके

Back to top button