हार्दिक पंड्याचा झंझावात 55 चेंडूंत 158 धावा | पुढारी

हार्दिक पंड्याचा झंझावात 55 चेंडूंत 158 धावा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

हार्दिक पंड्याने दुखापतीतून जोरदार पुनरागमन करीत आपला आक्रमक खेळ हा सुरूच ठेवला आहे. त्याने रिलायन्स वन संघाकडून खेळताना बीपीसीएलविरुद्ध अवघ्या 55 चेंडूंत 158 धावांची नाबाद खेळी केली. डी. वाय. पाटील टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने झंझावती खेळी केली.

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पंड्याने आपली छाप पाडली. त्याने आपल्या या खेळीत 20 चौकार व सहा षटकार मारले. या सोबतच त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये कोणत्याही भारतीयाद्वारे केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी श्रेयस अय्यरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 147 धावांची खेळी केली होती. यामुळे मैदानामध्ये उपस्थित प्रेक्षकांचेदेखील चांगले मनोरंजन झाले. या सामन्यात शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार आणि श्रेयस अय्यरदेखील होते. हार्दिकच्या या खेळीच्या जोरावर रिलायन्सने 4 बाद 238 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या बीपीसीएल संघाला 134 धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले.

संबंधित बातम्या

हार्दिकच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या पाच महिन्यांपासून तो या दुखापतीमधून सावरत होता. तो न्युझीलंड दौर्‍यावरदेखील गेला नाही. हार्दिक बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अ‍ॅकॅडमीत फिटनेससाठी मेहनत घेत होता. यापूर्वी त्याने सीएजीविरुद्धच्या ‘क’ गटातील सामन्यात 105 धावांची खेळी केली होती.

Back to top button