फायनलपूर्वी कांगारुंची फास्ट बॉलर घाबरली; कर्णधाराला केली ‘ही’ विनंती | पुढारी

फायनलपूर्वी कांगारुंची फास्ट बॉलर घाबरली; कर्णधाराला केली 'ही' विनंती

मेलबर्न : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-20 क्रिकेट विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना रविवारी रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाची फास्ट बॉलर मेगन स्कॉट भारतीय सलामीवीरांना घाबरल्याचे दिसले. तिने आपली कर्णधार मेग लेनिंगला विनंती केली आहे. ज्यावेळी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना फलंदाजी करत असतील त्यावेळी मला गोलंदाजी देऊ नको अशी विनंती तिने केली आहे.

आतापर्यंत झालेल्या 6 टी-20 विश्वचषकापैकी 4 विश्वचषकावर आपले नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 8 मार्चच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची यंग ब्रिगेड भिडणार आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत भारताला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन आले आहेत. यात मोलाचा वाटा उचलला आहे तो 16 वर्षाच्या शेफाली वर्माने. याच शेफाली वर्मा आणि दुसरी सलामीवीर स्मृती मानधनाचा धसका ऑस्ट्रेलियाची फास्ट बॉलर मेगन स्कॉटने घेतला आहे. तीने अंतिम सामन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत ‘मला भारताविरुद्ध खेळायला आवडत नाही. कारण त्यांनी माझी चांगलीच धुलाई केली होती.’ ती पुढे म्हणाली ‘स्मृती आणि वर्मा यांनी माझी चांगली धुलाई केली होती. ट्राय सिरीजमध्ये त्यांनी मला आतापर्यंतचे सर्वात मोठे सिक्सर मारले आहेत.’ 

संबंधित बातम्या

फायनच्या तयरीबाबत बोलताना ती म्हणाली ‘स्वाभाविकपणे आम्ही भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी आता गेम प्लॅन तयार केला आहे. पण, या दोघांना पॉवर प्लेमध्ये रोखण्यासाठी मी उत्तम पर्याय नाही. त्यांना माझी गोलंदाजी खेळण्यात काहीच अडचण येत नाही.’

स्कॉटची टी-20 मध्ये भारताविरुद्धची कामगिरी तितकीशी चांगली नाही. तिची टी-20 मधील सरासरी 5.98 इतकी आहे. तर भारताविरुद्ध हीच सरासरी 6.93 इतकी होते. विकेट घेण्याच्या बाबतीतही इतर संघाविरुद्ध 15.68 इतकी सरासरी मात्र भारताविरुद्ध 24.66 वर पोहचते. 

भारताच्या अंतिम सामन्यातील आव्हानाबाबत बोलताना ती म्हणाली, ‘आम्ही अंतिम सामन्याबाबत बऱ्याच वेळापासून चर्चा करत होतो. नुकत्याच झालेल्या ट्राय सिरीजचा विचार करता अंतिम सामन्यात भारत यावा असे वाटत होते. भारतविरुद्ध खेळणे इतके आव्हानात्मक नाही. नुकतेच आम्ही ज्यांच्याबरोबर जास्त क्रिकेट खेळलो आहे त्या संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणे चांगले आहे. त्यानाही असेच वाटत असेल.’

Back to top button