तुम्ही वटवाघूळ, कुत्रे आणि मांजरी कशा खाऊ शकता? | पुढारी

तुम्ही वटवाघूळ, कुत्रे आणि मांजरी कशा खाऊ शकता?

कराची : वृत्तसंस्था

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आहे. कोरोना व्हायरसने प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण केली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी अनेक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. संपूर्ण जगाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीसाठी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने चीनला जबाबदार धरले आहे, त्यांच्या विचित्र आहार पद्धतीमुळे जगावर ही परिस्थिती ओढवली असल्याचे त्याने म्हटले आहे.

कारण कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधून झाली आहे. शोएबने आपल्या यू ट्यूब चॅनलवरून चीनवर सर्व राग काढला आहे. आपल्या व्हिडीओमध्ये शोएबने चिनी लोकांच्या खाण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, चीनवर संपूर्ण जगाला संकटात टाकल्याचा आरोप केला आहे. “मला हे समजत नाहीय की, तुम्ही वटवाघूळ का खाता? त्यांचे रक्त का पिता? त्यामुळे संपूर्ण जगात धोकादायक व्हायरस पसरतो. मी चिनी लोकांबद्दल बोलतोय, त्यांनी संपूर्ण जगाला संकटात टाकले आहे. खरोखरच मला हे समजत नाहीय की, तुम्ही वटवाघूळ, कुत्रे आणि मांजरी कशा खाऊ शकता? माझा संताप होतो आहे,” असे शोएब अख्तरने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

“संपूर्ण जग आज संकटात आहे. पर्यटन उद्योगाला फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होतोय आणि संपूर्ण जगाचा प्रवास ठप्प होण्याच्या दिशेने सुरू आहे,” असे अख्तर म्हणाला. आपण जे बोलतोय ते आपल्यावर उलटू शकते हे लक्षात आल्यानंतर अख्तरने मी चीनच्या लोकांविरोधात नाही हे सुद्धा त्याने स्पष्ट केले. “मी चीनच्या लोकांविरोधात नाहीय. ही तुमची संस्कृती आहे हे मी समजू शकतो, पण आता त्यामुळे तुमचे नुकसान होतेय. चीनवर बहिष्कार घाला, असे मी अजिबात म्हणणार नाही, पण काही तरी कायदा असलाच पाहिजे. तुम्ही काहीही खाऊ शकत नाही,” असे अख्तर म्हणाला.

Back to top button