महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द धोक्यात? | पुढारी | पुढारी

महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द धोक्यात? | पुढारी

मुंबई : वृत्तसंस्था 

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता होती. जर धोनीने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली असती तर, ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याला स्थान मिळण्याची शक्यता होती. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याने भारताला जेतेपद मिळवून दिले होते. सध्या कोरोना साथीमुळे आयपीएल होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे धोनीच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकंदरीतच आयपीएल झाली नाही आणि धोनीने निवृत्ती जाहीर केली, तर कोरोनानेच धोनीची विकेट काढली, असे म्हणावे लागेल.

धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशन रंजन बॅनर्जीच्या मते धोनी भारताच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये स्थान मिळवेल. आयपीएल स्पर्धा 29 मार्चपासून सुरू होणार होती. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली. आता 21 दिवस असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

धोनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत पराभूत झाल्यानंतर क्रिकेटपासून दूर आहे. बॅनर्जी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत आयपीएल होईल असे वाटत नाही. आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. पण, धोनीला टी-20 विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळेल, असे मला वाटते. धोनी चेन्नईवरून आल्यानंतर मी त्याच्याशी बोललो आणि त्याच्या आई-वडिलांच्या संपर्कात आहे. तो फिटनेस ट्रेनिंग करत असून पूर्णपणे फिट आहे.

आयपीएलमध्ये धोनीच्या भविष्याबाबत स्पष्टता येईल. असे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले होते. आयपीएल स्थगित झाल्यानंतर धोनीच्या पुनरागमनाबाबत माजी फलंदाज सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत बोलताना बॅनर्जी यांनी सांगितले की, ही गोष्ट खरी आहे की, त्याने जुलैपासून कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही. पण, त्याच्याकडे 538 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे व त्याला लय मिळवण्यासाठी वेळ लागणार नाही. 

बॅनर्जींनी भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांची गोष्टी ऐकली नसावी, जी त्यांनी पदभार संभाळल्यानंतर सांगितली होती. जोशी पदभार सांभाळल्यानंतर म्हणाले होते की, धोनीवर विचार तेव्हाच होईल, जेव्हा तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेल. आयपीएलमध्ये अनेक युवा व वरिष्ठ खेळाडू खेळताना दिसतील. जर तो चांगला खेळेल तर, त्याच्या नावावरदेखील विचार होईल. तुम्हाला काही आश्चर्यचकित करणारी नावेदेखील दिसू शकतात. एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर धोनीच्या भविष्याबाबत चर्चा होऊ लागली. बीसीसीआयने जेव्हा आपल्या वार्षिक करारातून धोनीला वगळले, तेव्हा चर्चांना आणखीन उधाण आले.

गेल्या वर्षी वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी जेव्हा भारतीय संघाची निवड होणार होती, तेव्हा धोनीने स्वत:ला सर्व निवडींपासून दूर ठेवले असल्याची चर्चा होती. तो निवृत्तीची घोषणा करणार नाही. कारण, त्याला 2020 आयपीएल स्पर्धा खेळायची आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत आयपीएल होणे कठीण दिसत आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू असून ते अजून पुढे सुरू राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आयपीएल नक्कीच रद्द होऊ शकते. त्यामुळे कदाचित सात नंबर जर्सी परिधान करणार्‍या या महान खेळाडूला अशीच निवृत्ती घ्यावी लागेल. पण, धोनीसारख्या महान खेळाडूसाठी हे विचित्र असेल.

आयपीएल स्थगित झाले तरी धोनीला आणखीन एक संधी मिळेल : प्रशिक्षक

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन होणे जवळपास कठीण दिसत आहे. पण, धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशन रंजन बॅनर्जी यांच्या मते धोनी भारताच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये स्थान मिळवेल. 

बॅनर्जी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत आयपीएल होईल असे वाटत नाही. आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागले. पण, धोनीला टी-20 विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळेल, असे मला वाटते. धोनी चेन्नईवरून आल्यानंतर मी त्याच्याशी बोललो आणि त्याच्या आई-वडिलांच्या संपर्कात आहे. तो फिटनेस ट्रेनिंग करत असून पूर्णपणे फिट आहे.

बॅनर्जी यांनी सांगितले की, ही गोष्ट खरी आहे की, त्याने जुलैपासून कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही; पण त्याच्याकडे 538 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे व त्याला लय मिळवण्यासाठी वेळ लागणार नाही. रांचीमध्ये सर्व बंद आहे; पण आपल्या घरात तो फिटनेस ट्रेनिंग करत आहे. त्याच्याकडे जिम, बॅडमिंटन कोर्ट आणि रनिंग कॉरिडोर सर्व काही आहे.

Back to top button