स्टीव्ह स्मिथच्या कर्णधारपदाचा मार्ग मोकळा पण…   | पुढारी

स्टीव्ह स्मिथच्या कर्णधारपदाचा मार्ग मोकळा पण...  

सिडनी : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार, उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला बॉल टॅम्परिंग प्रकरणी एक वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. त्याचा हा बंदीचा काळ संपल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झोकात पुनरागमन केले. पण, स्मिथवर १२ महिने न खेळण्याच्या बंदाबरोबरच दोन वर्षे कर्णधारपद भूषवण्यावरही बंदी घातली होती. ती बंदी आज (दि.२९) संपली. पण, डेव्हिड वॉर्नरवर कोणतेही नेतृत्व करण्यावर आजन्म बंदी घातली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २०१८ मध्ये झालेल्या केपटाऊन कसोटीवेळी चेंडू सँडपेपरने घासल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक कारवाई करत १२ महिन्यांची बंदी घातली होती. याचबरोबर त्याला कर्णधारपदावरही दोन वर्षासाठी पाणी सोडावे लागले. पण, आता ही बंदी संपली आहे. जरी स्मिथची कर्णधार पदाची बंदी संपली असली तरी त्याच्या कर्णधार पदाचा मार्ग बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व सध्या टीम पेनेकडे आहे. तो स्मिथसाठी आपले कर्णधारपद सोडणार का याची स्पष्टता अजून मिळालेली नाही. तो सध्या ३५ वर्षाचा आहे आणि त्याची अजून क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. याचबरोबर संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही गेल्या वर्षभरापासून पेनेच्या नेतृत्वाला उचलून धरले आहे. लँगर यांनी पेने नेतृत्वात हुशार असेल्याची शाबासकी दिली होती. तर स्मिथ पुन्हा अव्वल फलंदाजीच्या दडपणाबरोबर कर्णधारपदाचा भार उचलण्याची शक्यता नाही असे म्हटले होते. एकदिवसीय आणि टी – २० संघाचे कर्णधारपद सध्या अॅरोन फिंच सांभाळत आहे. 

दरम्यान, स्मिथने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मलाखत दिली. त्यात त्याने कोरोना संकटामुळे झालेल्या शटडाऊनच्या काळात शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. 

Back to top button