रायडर ‘गौरव’ची चटका लावणारी एक्झिट... | पुढारी

रायडर ‘गौरव’ची चटका लावणारी एक्झिट...

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

क्रीडानगरी कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घालणारा मोटारसायकल रायडर आणि रेसर म्हणून गौरव पाटील यांची ओळख आहे. नुकतेच त्यांचे कोरोनाने निधन झाले. रायडर गौरवच्या चटका लावणार्‍या एक्झिटने त्यांच्या मित्र परिवारासह एकूणच क्रीडानगरी हळहळली. 

‘मामा’ नावाने ओळखला जाणार्‍या गौरवने कायनॅटिक, नंतर यामाहा आणि बुलेट अशा चढत्या क्रमाने रेसिंगमधील आपल्या करिअरची वाटचाल केली. 250 किलोच्या बोजड गाडीलाही एखाद्या छोट्याशा लुनासारखे चालविण्याचे कसब गौरवने मिळवले होते. सुमारे 6 फूट उंची, भक्कम शरीरयष्टी आणि रांगडा स्वभावाचा गौरव मनाने कोमल होता. 2017 साली गोव्यातील रायडर मेनिया या स्पर्धेत ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पिअन्स’ मिळविणार्‍या गौरवला 2018 सालच्या स्पर्धेत आपल्याच मित्राकडून पराभव पत्करावा लागला. तर 2019 साली अपघातामुळे बरगड्यांना झालेल्या  दुखापतीचा विचार न करता रेस पूर्ण केली होती. 

सुहानी या आपल्या 16 वर्षांच्या मुलीलाही तिच्या हट्टाखातर गौरवने रेसर म्हणून घडवले. सुहानीने टीव्हीएस, मोटोक्रॉस, रॉयल रोडिओ आणि रायडर मेनिया यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी सुरू ठेवली आहे. सर्व क्षेत्रांत लढवय्या असणार्‍या गौरव पाटीलने कोरोनाबरोबरही जिद्दीने लढा दिला. 15 दिवस या आजाराशी झुंजत असतानाच आपल्या मित्रांना ‘काही नाही रे, थोड्या दिवसात येतो बाहेर, अजून भरपूर रायडिंग करायचंय…’ असं सांगत अखेरचा श्वास घेतला.

Back to top button