प्रेक्षकांविना स्पर्धा सुनी सुनी वाटेल : श्रेयस | पुढारी

प्रेक्षकांविना स्पर्धा सुनी सुनी वाटेल : श्रेयस

दुबई : वृत्तसंस्था

किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील आपला पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स खेळणार आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनुसार बायो बबलमध्ये राहणे आव्हानात्मक असून मैदानावर दर्शकांची कमतरता जाणवेल. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये आरोग्य आणि सुरक्षेबाबत कठोर नियम करण्यात आले आहेत. एरवी आयपीएल म्हटले, की स्टेडियममध्ये तिकीट मिळणे ही मोठी गोष्ट; पण यंदाचे आयपीएल खाली स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे.

बायो बबलमध्ये राहणे हे आव्हानात्मक आहे; पण आम्ही आरोग्य प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत आहोत. आम्ही दोन सराव सामने खेळलो; पण त्यामध्ये आनंद साजरा केला नाही. परंतु, यासंदर्भात आम्हाला विशेष सत्रामध्ये माहिती देण्यात येईल, असे व्हच्युर्र्अल पत्रकार परिषदेत श्रेयस म्हणाला. 

दर्शकांची कमतरता किती जाणवेल, यावर बोलताना अय्यरने सांगितले, की आयसीसीच्या नियमांचे पालन आम्हाला करायचे आहे; पण प्रेक्षक नेहमी खेळांडूमध्ये ऊर्जा निर्माण करत असतात. मैदानात आवाज व टाळ्यांची उणीव आम्हाला भासेल.

अनेक हंगामांच्या अपयशानंतर गेल्या सत्रात दिल्लीचा संघ नवीन मालक, नवीन कोचिंग स्टाफ आणि बदल करत तिसर्‍या स्थानी राहिला होता. श्रेयस याबद्दल म्हणाला, की गेल्या सत्रात कोणत्याही खेळाडूने कुठलीच तक्रार केली नाही. आम्ही चांगली कामगिरी करत तिसर्‍या स्थानी राहिलो. 

पंतकडून अपेक्षा आहेत; पण दबाव टाकणार नाही : पाँटिंग

दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगला स्टार फलंदाज ऋषभ पंतकडून इंडियन प्रीमियर लीगच्या या सत्रात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे; पण त्यावर अपेक्षांचे ओझे टाकणार नाही. संपूर्ण संघाकडूनच अपेक्षा आहेत आणि ऋषभ यावेळी चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे. कोचिंग स्टाफचे काम हे दबावावर काम करणे आहे, जेणेकरून खेळाडू आपला स्वाभाविक खेळ खेळू शकेल. आयपीएलच्या गेल्या सत्रात पंतने 16 सामन्यांत 488 धावा केल्या होत्या. त्याने सराव सामन्यात देखील चमक दाखवली. 

Back to top button