आयसीसीच्या अध्यक्षपदी न्यूझीलंडचे ग्रेग बारक्ले यांची निवड | पुढारी

आयसीसीच्या अध्यक्षपदी न्यूझीलंडचे ग्रेग बारक्ले यांची निवड

दुबई : न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख ग्रेग बारक्ले यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. बारक्ले यांनी सिंगापूरच्या इम्रान ख्वाजाला मागे टाकले आणि ते भारताचे शशांक मनोहर यांची जागा घेतील. आयसीसीच्या त्रैमासिक बैठकीदरम्यान मतदान करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक प्रक्रियेत 16 बोर्ड ऑफ डायरेक्टरर्सनी सहभाग नोंदवला. ज्यामध्ये कसोटी खेळणारे 12 पूर्ण सदस्य, तीन असोसिएट देश आणि एक स्वतंत्र महिला निदेशक यांचा समावेश आहे. ‘आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड होणे ही सन्मानाची गोष्ट आहे आणि पाठिंब्यासाठी मी आयसीसीच्या सर्व संचालकांचे आभार मानतो. मला विश्वास आहे की, आपण एकत्रितपणे खेळाला पुढे घेऊन जाऊ आणि जागतिक महामारीतून सावरत मजबूत पुनरागमन करू.

मी आपल्या सदस्यांसोबत मिळून मजबूत ठिकाणाबाहेर देखील खेळाला मजबूत करण्यास उत्सुक आहे. जेणेकरून जगातील अनेक लोकांना क्रिकेटचा आनंद घेता येईल,’ असे बारक्ले म्हणाले. न्यूझीलंडच्या या अधिकार्‍याने मतदानात 11-5 असा विजय मिळवला. दुसर्‍या फेरीत त्यांना क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे महत्त्वपूर्ण मत मिळाले. त्यामुळे त्यांना विजय मिळवता आला. गेल्या आठवड्यात पहिल्या फेरीच्या मतदानात त्यांना 10 आणि ख्वाजा यांना सहा मते मिळाली होत ी; पण सध्याच्या नियमानुसार विजय मिळवण्यासाठी 16 सदस्यांच्या आयसीसी बोर्डात दोन तृतीयांश बहुमत म्हणजे 11 मते मिळवण्याची गरज होती.

 

Back to top button