…तर विराट खेळणार तिसर्‍या स्थानी | पुढारी

...तर विराट खेळणार तिसर्‍या स्थानी

लंडन : वृत्तसंस्था

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. यामुळे येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार्‍या कसोटी मालिकेसाठीच्या अंतिम अकराबाबत आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे. असेही म्हटले जात आहे की, दुसरी दिवार म्हणून ओळखल्या जाणार्‍या चेतेश्‍वर पुजाराच्या कामगिरीवर संघ व्यवस्थापन नाराज आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आयोजित करण्यात येणार्‍या इंट्रास्क्‍वाडच्या दोन सराव सामन्यांत पुजाराने चांगली कामगिरी केली नाही, तर त्याला अंतिम अकरामधून वगळण्यात येऊ शकते. जर पुजाराला वगळण्यात आले, तर कर्णधार विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. असे झाल्यास मधल्या फळीत लोकेश राहुल अथवा हनुमा विहारीला संधी दिली जाऊ शकते. विहारीने यावर्षी कौंटी सामने खेळले आहेत. 

पुजाराला एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखण्यात येते. मात्र, काही काळापासून त्याची बॅट म्हणावी तशी तळपलीच नाही. तो बचावाशिवाय काहीच करेनासा झाला आहे. सलामी फलंदाज शुभमन गिलही सातत्याने अपयशी ठरत आहे. फेब्रुवारीत चेन्‍नईमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतर गिलने 0, 14, 11, नाबाद 15, 0, 28 आणि 8 अशा धावांची खेळी केली आहे. यामुळे सलामी जोडीतही बदल होऊ शकतो. प्रसंगी के. एल. राहुलसोबत रोहित सलामीला येऊ शकतो. त्यानंतर गिलला तिसर्‍या क्रमांकावर येण्याची शक्यता  आहे.

 

Back to top button