IPL 2022 : मिलरपुढे चेन्नईचे लोटांगण | पुढारी

IPL 2022 : मिलरपुढे चेन्नईचे लोटांगण

पुणे वृत्तसंस्था : गुजरात टायटन्सचा एकटा डेव्हिड मिलर असामान्य योद्ध्यासारखा लढला आणि त्याने चेन्नईच्या तोंडातून विजयाचा घास काढला. शेवटच्या चेंडूपर्यंत चित्तथरारक झालेल्या या लढतीत गुजरातने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना चेन्नई सुपर किंग्जचा 3 गडी राखून पराभव केला. एक चेंडू बाकी असतानाच 170 धावा ठोकून गुजरातने रोमांचकारी विजयावर शिक्कामोर्तब केले. आता नियमित कर्णधार हार्दिक पंड्याऐवजी या लढतीत राशिद खानने गुजरातचे नेतृत्व केले. गुजरातची सुरुवातच धक्कादायक झाली. सलामीवीर शुभमन गिल आणि विजय शंकर यांना भोपळाही फोडता आला नाही. पाठोपाठ बारा धावा करून अभिनव मनोहर हाही तंबूत परतला. त्यावेळी गुजरातची अवस्था 3 बाद 16 अशी केविलवाणी झाली होती. वृद्धिमान साहा याच्या धावाच होत नव्हत्या. त्याला जडेजाने बाद केले. धोकादायक राहुल तेवतियादेखील फटकेबाजी करू शकला नाही. 6 धावांसाठी त्याने तब्बल 14 चेंडू घेतले. त्यानंतर राशिद खान आणि मिलर या जोडीने सामन्याचा नूरच पालटवला. राशिदने 21 चेंडूंत 40 धावा कुटल्या त्यात 2 चौकार आणि 3 षटकारांसह.

गुजरातकडून वादळी फलंदाजी केली ती डेव्हिड मिलरने. एखाद्या पर्वतासारखा तो मैदानावर पाय घट्ट रोवून उभा राहिला. दुसर्‍या बाजूने नियमितपणे फलंदाज बाद होत होते तरी त्याने त्याची तमा बाळगली नाही. 94 धावा झोडताना त्याने 51 चेंडू घेतले. या खेळीत मिलरने 8 चौकार आणि 6 गगनभेदी षटकारांची आतषबाजी केली. खरे सांगायचे तर हा सामना मिलर विरुद्ध चेन्नई असाच झाला. क्षणाक्षणाला विजयाचे पारडे दोन्ही बाजूंना झुकत होते आणि प्रेक्षक थरारत होते. चेन्नईकडून ब्राव्होने 3, तीख्शानाने 2 तर मुकेश चौधरी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी टिपला.

त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 169 धावा केल्या. त्यांचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला अखेर सूर गवसला. मात्र, चेन्नईची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर रॉबिन उथप्पा याला मोहम्मद शमीने 3 धावांवर पायचीत पकडले, तर अल्झारी जोसेफने मोईन अलीला त्रिफळाबाद केले. मोईनने तेव्हा अवघी 1 धाव केली होती. फलकावर तेव्हा 32 धावा लागल्या होत्या. त्यानंतर अंबाती रायुडू आणि ऋतुराज यांची जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 92 धावा जोडल्या. रायुडूला मोहम्मद शमीने विजय शंकरच्या हाती झेल द्यायला लावला. रायुडूचे अर्धशतक थोडक्यात हुकले. त्याने 31 चेंडूंत 46 धावा फटकावल्या त्या 4 चौकार आणि 2 षटकारांसह. पाठोपाठ पाचव्या गड्याच्या रूपाने ऋतुराज 71 धावांवर बाद झाला. त्याने 48 चेंडूंचा सामना केला. 5 चौकार व तेवढेच षटकार खेचून त्याने सामन्यात रंग भरले. यश दयाळच्या गोलंदाजीवर अभिनव मनोहरने त्याला छान टिपले. कर्णधार रवींद्र जडेजा व शिवम दुबे यांनी 37 धावांची भागीदारी केली. जडेजाने 12 चेंडूंत 22 धावा कुटताना 2 षटकार लगावले. दुबेने 19 धावांची उपयुक्त खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने सुरेख मारा केला. 4 षटकांत त्याने केवळ 20 धावा देऊन एक बळी मिळवला. हंगामी कर्णधार राशिद खान यानेही अवघ्या 29 धावा दिल्या. अल्झारी जोसेफने दोन तर यश दयाळने एक गडी बाद केला. लॉकी फर्ग्युसन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत 46 धावा मोजल्या.

राशिद हंगामी कर्णधार

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी राशिद खान याच्याकडे सोपवण्यात आली होती. नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याला कंबरदुखीने हैराण केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि पाहता पाहता राशिदने गुजरातला सामनाही जिंकून दिला.

गुजरात टायटन्सचे अव्वलस्थान कायम

गुजरात टायटन्सने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आता सहा सामन्यांतून त्यांचे दहा गुण झाले आहेत. पाच सामने जिंकताना त्यांनी फक्त एक सामना गमावला आहे. दुसरीकडे चेन्नईने सहा सामन्यांतून केवळ एका विजयासह दोन गुण कमावले आहेत. त्यांनी पाच सामने गमावले आहेत.

Back to top button