LSG Vs CSK : विजयासाठी लखनौ आज चेन्‍नई सुपर किंग्ज झुंजणार | पुढारी

LSG Vs CSK : विजयासाठी लखनौ आज चेन्‍नई सुपर किंग्ज झुंजणार

मुंबई; वृत्तसंस्था : आयपीएलअंतर्गत गुरुवारी चेन्‍नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG Vs CSK) यांच्यातील लढत मुंबईमध्ये रंगणार असून दोन्ही संघ पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असतील.

आपल्या पहिल्या सामन्यात चेन्‍नईला कोलकाता नाईट रायडर्सने तर लखनौला (LSG Vs CSK) हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने पराभूत केले होते. मधल्या फळीतील अपयश हे दोन्ही संघांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. गुजरातविरुद्धच्या सामन्यात लखनौचा कर्णधार के. एल. राहुल याला स्थिरावण्याची संधीच मिळाली नव्हती. शिवाय त्यांच्या अन्य फलंदाजांनीही निराशाच केली. त्यामुळे चेन्‍नईविरुद्ध त्या सगळ्या चुका टाळून विजय मिळवण्यासाठी लखनौला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल.

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवल्या जाणार्‍या या सामन्यात चेन्‍नईसाठी (LSG Vs CSK) समाधानाची बाब म्हणजे मोईन अलीचे संघात येणे. तो पिंच हिटर म्हणून ओळखला जातो. त्याला कदाचित तिसर्‍या क्रमांकावर पाठवले जाईल, अशी अटकळ आहे. रवींद्र जडेजा याने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच लढतीत त्याला हार पत्करावी लागली आणि तीसुद्धा धोनीसारखा मुरब्बी मार्गदर्शक संघात असताना. अर्थात, चेन्‍नईचा संघ सुरुवातीच्या सामन्यांत फारसा चमकत नाही, असेच आतापर्यंत दिसून आले आहे. ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हिड कॉनवे, अंबाती रायुडू यांसारखे दिग्गज फलंदाज संघात असूनही चेन्‍नईला कोलकाताविरुद्ध दारुण अपयशाचा सामना करावा लागला होता. लखनौविरुद्ध त्यांची कामगिरी झळाळून उठेल, अशी अपेक्षा आहे.

दुसरीकडे लखनौचा कर्णधार राहुल (LSG Vs CSK) याला मैदानात पाय रोवून फलंदाजी करावी लागेल. या संघात क्विंटन डीकॉक, मनीष पांडे, दीपक हुड्डा यांसारखे नावावलेले खेळाडू आहेत. मात्र, चेन्‍नईच्या गोलंदाजीचा सामना किती धैर्याने करणार यावरच त्यांचे यश अवलंबून आहे. कोणता संघ सरस ठरणार हे स्पष्ट होण्यासाठी क्रिकेटरसिकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

संघ यातून निवडणार :

लखनऊ सुपरजायंट्स – केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्क वुड, आवेश खान, अंकित राजपूत, के गॉथम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसिन खान, आयुष बडोनी, काइल मेयर्स, करण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव.

चेन्नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉन्वे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महीष तीक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग.

Back to top button